Join us  

IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी

शुबमन गिल आणि पंत जोडीनं पाचव्या विकेटसाठी रचली ९६ धावांची भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 11:51 AM

Open in App

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात ड्रिंक्स ब्रेकआधी रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी आपली अर्धशतके साजरी केली. दोघांनी ४ बाद ८६ धावांवरून भारतीय संघाचा डाव पुढे नेला. अजाज पटेलच्या गोलंदाजीवर ३ खणखणीत चौकार मारून रिषभ पंतनं अगदी तोऱ्यात दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली.   

शुबमन गिलपाठोपाठ पंतची विक्रमी फिफ्टी 

भारतीय संघाच्या 30 व्या षटकातील सोधीच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेत शुबमन गिलनं अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ६५ चेंडूचा सामना केला.  याच षटकातील चौथ्या चेंडूवर सिंगल घेत पंतनही अर्धशतक साजरे केले. यासाठी त्याने फक्त ३६ चेंडूचा सामना केला. या खेळीसह पंत न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत भारताकडून जलद अर्धशतक करणारा फलंदाजही ठरला आहे. ड्रिंक्स ब्रेकआधी दोघांनी अर्धशतक साजरे करून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी केली. 

दोन्ही खेळाडूंना मिळालं जीवनदान, पण शतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर फुटली जोडी

शुबमन गिलला अर्धशतक झळकावण्या आधी तर रिषभ पंतला अर्धशतकानंतर प्रत्येकी एक-एक जीवनदान मिळाल्याचेही पाहायला मिळाले. भारताच्या डावातील २७ व्या षटकात ग्लेन फिलिप्सच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मार्क चॅपमॅन याने  शुबमन गिलचा सोपा झेल सोडला. ३५ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पुन्हा ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर हेन्री मॅटनं पंतचा झेल सोडला. यावेळी तो ५४ धावांवर खेळत होता. पण सोधीनं पंतच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. 

चौकार मारल्यावर अंपार कॉलच्या नियमात अडकला पंत, सोधीला मिळाली विकेट 

भारताच्या डावातील ३८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंतनं सोधीला चौकार मारला. त्यानंतर सोधीनं टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर पडला. हा चेंडू  खेळण्यासाठी पंत बॅकफूटवर गेला अन् इथंच तो फसला. सोधीचा चेंडू इतका वळला की पंतच्या बॅटला चकवा देत चेंडू पॅडवर आदळला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केलेल्या अपीलवर मैदानातील पंचांनी पंतला आउट दिलं. पंतन शुबमन गिलसोबत चर्चा करत रिव्हू घेतला. पण तो अंपायर कॉल निघाला. याचा अर्थ भारताचा रिव्ह्यू वाचला पण पंतची विकेट गमावण्याची वेळ आली. अंपायर कॉलमध्ये मैदानातील पंच जो निर्णय देतात तो कायम ठेवला जातो. अंपायर कॉलच्या नियमातून पंत-शुबमन गिल जोडी फुटली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरिषभ पंतशुभमन गिल