India vs New Zealand, 3rd Test : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा दुसरा डाव संपुष्टात आला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच रवींद्र जडेजानं एजाज पटेलला आउट करत न्यूझीलंडचा दुसरा डाव १७४ धावांवर खल्लास केला. या विकेटसह जड्डूनं दुसऱ्या डावातही पाच विकेट्स हॉलची पराक्रम करून दाखवला. न्यूझीलंडच्या संघानं मुंबईच्या मैदानात भारतीय संघासमोर १४७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळण्याच्या नादात रोहितनं आपली विकेट गमावली. त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शुबमन गिलला एजाज पटेलनं अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. तोही हजेरी लावत संघाच्या धावसंख्येत अवघ्या एका धावेची भर घालून परतला. एजाज पटेलनेच त्याची विकेट घेतली.
विल यंगची फिफ्टी अन् जड्डूचा पंजा
तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं पहिल्या डावात २३५ धावा केल्या होत्या. पाहुण्या संघाला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने पहिल्या डावात २६३ धावा करत २८ धावांची अल्प आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात विल यंगच्या १०० चेंडूतील ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने १७४ धावा केल्या. विल यंगशिवाय डेवॉन कॉन्वे ४७ चेंडूत २२ धावा आणि डॅरिल मिचेल २१ (४४) आणिग्लेन फिलिप्स याने१४ चेंडूत २६ धावांची खेळी केली. भारताकडून जडेजानं दुसऱ्या डावातही पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवला. त्याच्याशिवाय अश्विननं ३ तर वॉशिंग्टन सुंदरआणि आकाश दीप यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.