India vs New Zealand, 3rd Test Day 2 Stumps : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल १५ विकेट्स पडल्या आहेत. भारताच्या संघाने पहिल्या डावात ६ विकेट्स गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा करत १४३ धावांची आघाडी घेतलीये. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी एजाज पटेल १४ चेंडूत ७ धावांवर खेळत होता. तिसऱ्या दिवसाच्या खेळात विल ओ'रुर्केसोबत तो न्यूझीलंडच्या धावसंख्येत आणखी काही धावांची भर घालण्यासाठी मैदानात उतरेल.
न्यूझीलंडचा संघ टीम इंडियासमोर किती धावांचे टार्गेट सेट करणार?
तिसऱ्या दिवशी शेवटची विकेट घेत टीम इंडिया पाहुण्या संघाला दिडशेच्या आत गुंडाळून धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्यास उत्सुक असेल. न्यूझीलंडची शेवटची जोडी धावसंख्येत आणखी किती धावांची भर घालणार? टीम इंडियाला विजयासाठी किती टार्गेट मिळणार? ते पाहण्याजोगे असेल. मुंबईतील वानखेडेच्या खेळपट्टीचा तोरा बघता चौथ्या इनिंगमध्ये अल्प धावसंख्याचा पाठलाग करणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पण एक गोष्ट स्पष्ट दिसतीये ती म्हणजे वानखेडेच्या मैदानात तिसऱ्या दिवशीच विजयाचे फटाके फुटतील. ही गोष्ट टीम इंडियानेच करावी, हिच भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.
शंभरीचा आकडा गाठता गाठता न्यूझीलंडचा अर्धा संघ परतला तंबूत
फलंदाजांसाठी चॅलेंजिंग झालेल्या मुंबईच्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात एकदम खराब झाली. तिसऱ्या इनिंगमध्ये खेळताना न्यूझीलंडचे स्टार फलंदाज अगदी स्वस्तात माघारी फिरले. न्यूझीलंडच्या धावफलकावर अवघ्या २ धावा असताना आकाश दीपनं न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथमला एका धावेवर तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडच्या धावफलकावर ३९ धावा असताना डेवॉन कॉन्वेच्या २२ (४७) रुपात वॉशिंग्टन सुंदरनं संघाला दुसरं यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विननं आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. त्याने रचिन रविंद्रचा ४(३) काटा काढला. पहिल्या डावात पंजा मारणाऱ्या जड्डूनं डॅरिल मिचेलच्या २१(४४) रुपात दुसऱ्या डावातील पहिली विकेट घेतली. टॉम ब्लंडेलही ४ (६) त्याच्या जाळ्यात फसला. शंभरीचा टप्पा गाठताना न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता.
दुसऱ्या डावातही 'पंजा' मारण्याच्या उंबरठ्यावर आहे जड्डू
आर अश्विननं ग्लेन फिलिप्सच्या २६ (१४) रुपात दुसऱ्या डावात दुसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली. त्यानंतर इश सोधी ८ (१४) आणि मॅट हेन्री १०( १६) यांना तंबूचा रस्ता दाखवत जड्डूनं आपल्या खात्यात ४ विकेट्स जमा केल्या. तो आता सामन्यात १० विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात शेवटची विकेट घेत तो दुसऱ्या डावातही पंजा मारणारका? ते पाहण्याजोगे असेल.