Join us  

India vs New Zealand 4th ODI : भारताची न्यूझीलंडविरुद्ध शरणागती पत्करण्याची ही पहिलीच वेळ नाही

India vs New Zealand 4th ODI: चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 10:01 AM

Open in App

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली. न्यूझीलंडविरुद्धची ही भारताची दुसरी नीचांक खेळी ठरली.नाणेफेक जिंकून कर्णधार केन विलियम्सनने भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. 200 वा वन डे सामना खेळणाऱ्या रोहितकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण, त्यावर तो खरा उतरला नाही. ट्रेंट बोल्टने सलामीवीर शिखर धवनला ( 13) माघारी पाठवले आणि भारतीय संघाची पडझड सुरू झाली. रोहितही ( 7) बोल्टच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ट झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा शुबमन गिल ( 9) फार काही चमक दाखवू शकला नाही.

अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांना मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु ते भोपळाही न फोडता ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर तंबूत परतले. पहिले पाच फलंदाज 33 धावांवर माघारी परतले. न्यूझीलंडविरुद्ध वन डे सामन्यात पहिले पाच फलंदाज 33 धावांवर बाद होण्याची ही नीचांक खेळी ठरली. त्यानंतर उर्वरित संघही झटपट माघारी परतला. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल या जोडीनं थोडा संघर्ष केला, परंतु ते संघाला शंभरी पार करून देऊ शकले नाही.

याआधी 2010 मध्ये डाम्बुल्ला येथे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 88 धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतरची ही दुसरी नीचांक खेळी ठरली. श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोनच संघांनी भारताला दोनवेळा शंभरीच्या आत बाद केले आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माबीसीसीआय