हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची उणीव चौथ्या वन डे सामन्यात प्रकर्षाने जाणवली. भारतीय संघाच्या फलंदाजांची न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर त्रेधातिरपीट उडाली. सलामीवीर माघारी परतल्यानंतर मधल्या फळीत भारताचा डाव सावरणे एकाही फलंदाजाला जमले नाही आणि भारताचा संपूर्पण संघ 92 धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडने हे लक्ष्य 8 विकेट व 212 चेंडू राखून सहज मिळवले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या विजयाची नोंद केली. वन डे क्रिकेट इतिहासात भारताचा हा सर्वात मानहानिकारक पराभव ठरला.
किवी कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे दोन फलंदाज 39 धावांवर माघारी परतले. मात्र, त्याचा फार परिणाम सामन्यावर झाला नाही. हेन्री निकोल्स व रॉस टेलर यांनी न्यूझीलंडला सहज विजय मिळवून दिला. निकोल्सने 42 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचत नाबाद 30 धावा केल्या, तर टेलरने 25 चेंडूंत नाबाद 37 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 3 षटकारांचा समावेश आहे. न्यूझीलंडने हा सामना 8 विकेट व 212 चेंडू राखून जिंकला. चेंडू राखून भारतावर प्रतिस्पर्धी संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी श्रीलंकेने 2010 मध्ये भारतावर 209 चेंडू राखून विजय मिळवला होता.