हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताला चौथ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे भारतीय संघाचा फक्त 92 धावांतच खुर्दा उडाला. भारताच्या या पराभवाचे मुख्य कारण कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
पराभवाचे कारण सांगताना रोहित म्हणला की, " ही खेळपट्टी संथ होती, त्याचबरोबर चेंडू चांगले स्विंगही होत होते. त्यामुळे या खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहणे गरजेचे होते. पण आम्ही या गोष्टीमध्ये सपशेल अपयशी ठरलो. आमचा एकही फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही. आम्हाला चांगल्या भागीदाऱ्या रचता आल्या नाहीत. त्यामुळेच आमचा पराभव झाला."
मालिका विजयानंतर आम्ही रीलॅक्स झालो नाही
सामन्यानंतर रोहित म्हणाला की, " आम्ही यापूर्वी तिन्ही सामने जिंकले आहेत. मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे चौथा सामना खेळताना आम्ही रीलॅक्स होतो, असे नाही. आम्ही पहिल्या तिन्ही सामन्यांसारखेच यावेळीही मैदानात उतरतो. पण यावेळी लौकिकाला साजेसा खेळ करण्यात आम्ही अपयशी ठरलो."
भारताचा मानहानीकारक पराभव
विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय फलंदाजांची फळी कशी ढेपाळते याची प्रचिती गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात आली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांवर तंबूत परतला आणि किवींनी 8 विकेट व 212 चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात किवी गोलंदाज ट्रेंट बोल्टने 10 षटकांत 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने एकाच देशात सर्वात जलद 100 विकेट्सचा विश्वविक्रम नावावर केला. त्याने पाकिस्तानच्या वकार युनिसचा विक्रम मोडला.
हॅमिल्टनवर झालेल्या चौथ्या वन डे सामन्यात बोल्टने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, केदार जाधव व हार्दिक पांड्या यांना बाद केले. भारताविरुद्ध एकाच सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो न्यूझीलंडचा सातवा गोलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध न्यूझीलंड गोलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. या विक्रमात शेन बाँड ( 6/23) आघाडीवर आहे.
रोहित शर्माचा हा 200 वा वन डे आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती, परंतु तो अपयशी ठरला. केवळ तोच नव्हे तर संपूर्ण संघ आज अपयशी ठरला. भारताच्या तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला आणि त्यात युजवेंद्र चहलच्या 18 धावा या सर्वोत्तम ठरल्या. रोहितला 150व्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता आणि योगायोग म्हणजे की तो सामना न्यूझीलंडविरुद्धच होता व त्यात ट्रेंट बोल्टनेच रोहितला बाद केले होते. कर्णधार म्हणून रोहितचा हा दुसरा पराभव ठरला. यातही योगायोग असा की दोन्ही पराभवात भारताचे सहा फलंदाज अवघ्या 35 धावांवर माघारी परतले होते.
Web Title: India vs New Zealand 4th ODI: Rohit Sharma said the real reason for the defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.