हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : चौथ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांच्यासमोर शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ 92 धावांत तंबूत परतला. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला युजवेंद्र चहल ( 18*) हा या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ट्रेंट बोल्टने सलग दहा षटकं टाकून 4 निर्धाव षटकांसह 21 धावा देताना पाच विकेट घेतल्या. त्याला कॉलीन डी ग्रँडहोमने ( 3/26) चांगली साथ दिली. चहलच्या या 18 धावा विक्रमी ठरल्या.
भारताचे सलामीचे फलंदाज झटपट माघारी परतले. बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. बोल्टने सलामीवीर शिखर धवनला ( 13) माघारी पाठवले आणि भारतीय संघाची पडझड सुरू झाली. रोहितही ( 7) बोल्टच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ट झाला. पदार्पणाचा सामना खेळणारा शुबमन गिल ( 9) फार काही चमक दाखवू शकला नाही.अंबाती रायुडू व दिनेश कार्तिक यांना मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु ते भोपळाही न फोडता ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर तंबूत परतले. कुलदीप यादव व चहल या जोडीनं थोडा संघर्ष केला, परंतु ते संघाला शंभरी पार करून देऊ शकले नाही. या जोडीने नवव्या विकेटसाठी 25 धावा जोडल्या. या सामन्यातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.
दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चहलने 37 चेंडूंत 3 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. या सामन्यात सर्वोत्तम धावा करणारा फलंदाज तो ठरला. याशिवाय दहाव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये चहलने दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात जवागल श्रीनाथ ( वि. पाकिस्तान, 1998) अव्वल स्थानावर आहे. त्याने 43 धावा केल्या होत्या.