सामन्याला सुरुवात होण्याच्या अर्ध्यातासापूर्वी न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सननं दुखापतीमुळे माघार घेतील. त्यामुळे टीम साउदीच्या नेतृत्वाखाली किवी मैदानावर उतरले. मालिकेत 0-3 अशा पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडनं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. इश सोढीची फिरकी अन् मिचेल सँटनरच्या अप्रतिम झेलच्या जोरावर यजमानांनी टीम इंडियाच्या धावांवर लगाम लावला. लोकेश राहुलनं फॉर्म कायम राखला, परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. मनीष पांडेनं अखेरच्या षटकांत खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत नाणेफेकीला आलेल्या टीम साउदीनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात दोन्ही संघांनी अंतिम अकरात बदल केले. न्यूझीलंड संघात दोन बदल... टॉम ब्रूस आणि डॅरील मिचेल यांना संधी, कर्णधार केन विलियम्सन व कॉलीन डी ग्रँडहोमला विश्रांती दिली, तर भारतीय संघात तीन बदल - संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी संघात, तर रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली.
त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन आणि लोकेश राहुल सलामीला आले. संजूनं खणखणीत षटकार खेचून आपल्या आगमनाची चाहूल दिली, पण पुढच्याच चेंडूवर तो माघारीही परतला. पुण्यातील ट्वेंटी-20 सामन्यातही षटकार अन् विकेट हेच पाहायला मिळाले होते. भारताला 14 धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर लोकेश आणि कर्णधार विराट कोहली यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. लोकेश प्रचंड जबाबदारीनं खेळताना पाहायला मिळाला. या मालिकेत त्यानं सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली. त्यानं ट्वेंटी-20 4000 धावांचा पल्ला पार केला.
पण, पाचव्या षटकात टीम बेन्नेटनं भारताला दुसरा धक्का दिला. पाचव्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार मारणाऱ्या कोहलीला त्यानं तिसऱ्या चेंडूवर चकवलं. मिचेल सँटनरनं तितक्याच खुबीनं कोहलीचा ( 11) झेल टिपला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही लगेच बाद झाला. इश सोढीच्या गोलंजादीवर यष्टिरक्षक टीम सेइफर्टनं त्याचा सुरेख झेल टीपला. लोकेश व शिवम दुबे ही जोडी टीकेल असं वाटत असताना सोढीनं भारताला मोठा धक्का दिला. त्याच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याचा मोह लोकेशच्या अंगलट आला अन् मिचेल सँटनरनं सीमेवर त्याचा झेल घेतला. लोकेशनं 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 39 धावा केल्या. भारतानं 10 षटकांत 4 बाद 83 धावा केल्या होत्या.
लोकेशची नुकतीच विकेट गेल्यानंतर संयमीपणा दाखवण्याचं सोडून दुबेनं फटका मारला आणि टॉम ब्रुसनं त्याचा अप्रतिम झेल टिपला. सोढीनं टीम इंडियाला दिलेला हा तिसरा धक्का होता. सँटनरनं पुढील षटकात वॉशिंग्टन सुंदरला भोपळाही फोडू न देता माघारी पाठवले. सोढीनं 4 षटकांत 26 धावांत तीन विकेट्स घेतल्या. सँटनरनेही 4 षटकांत 26 धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर मनीष पांडे आणि शार्दूल ठाकूर यांनी टीम इंडियाची लाज राखली. मनीषनं अखेरच्या षटकांत साजेसा खेळ करताना संघाला 8 बाद 165 धावांपर्यंत मजल मारून दिली. हॅमिश बेन्नेटनंही दोन केट्स घेतल्या. मनीष 37 चेंडूंत 3 चौकारांसह 50 धावांवर नाबाद राहिला.
टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह 'हरवलाय'?
नाणेफेकीपूर्वीच कर्णधाराची माघार, खांद्याला झाली गंभीर दुखापत
रिषभ पंत अन् संजू सॅमसन अपयशी, चाहत्यांची धोनीला साद; घ्या पुरावा
Web Title: India Vs New Zealand, 4th T20I: Manish Pandey and KL Rahul play brilliant innings, Team India set 166 runs target
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.