भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामना नाट्यमय झाला. मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीला किवींच्या कॉलीन मुन्रोनं तुफान फटकेबाजीनं उत्तर दिलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मोक्याच्या क्षणाला झेल सोडल्यानंही सामना किवींच्या पारड्यानं झुकला. किवींनी मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद करताना टीम इंडियाच्या घोडदौडीला ब्रेक लावला. मुन्रोनंतर टीम सेइफर्टनं दमदार खेळ केला. त्याच्या अर्धशतकी खेळीला रॉस टेलरची तुल्यबळ साथ मिळाली. अखेरच्या षटकात टेलरच्या विकेटनं सामन्यात चुरस निर्माण केली. टीम सेइफर्टही धावबाद झाला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर डॅरील मिचेलही झेलबाद झाला. शार्दूल ठाकूरनं अखेरच्या षटकात किवींच्या चार फलंदाजांना बाद करून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. त्यात किवींचे 14 धावांचे लक्ष्य टीम इंडियानं पार केले.
सामन्याला सुरुवात होण्याच्या अर्ध्यातासापूर्वी न्यूझीलंड कर्णधार केन विलियम्सननं दुखापतीमुळे माघार घेतील. त्यामुळे टीम साउदीच्या नेतृत्वाखाली किवी मैदानावर उतरले. मालिकेत 0-3 अशा पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंडनं चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. इश सोढीची फिरकी अन् मिचेल सँटनरच्या अप्रतिम झेलच्या जोरावर यजमानांनी टीम इंडियाच्या धावांवर लगाम लावला. लोकेश राहुलनं फॉर्म कायम राखला, परंतु त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. मनीष पांडेनं अखेरच्या षटकांत खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
अखेरच्या षटकातील नाट्यपहिला चेंडू - रॉस टेलर ( 24) झेलबाददुसरा चेंडू - डॅरील मिचेलनं चौकार मारलातिसरा चेंडू - टीम सेइफर्ट धावबादचौथा चेंडू - एक धावपाचवा चेंडू - मिचेल झेलबादसहवा चेंडू - सँटनर धावबाद
सुपर ओव्हरचा थरार...टीम सेइफर्ट आणि कॉलीन मुन्रो फलंदाजीला आले. जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरनं झेल सोडला.. त्यावर दोन धावा घेत सेइफर्टनं चौकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा सेइफर्टचा झेल लोकेश राहुलकडून सुटला. पण, चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टनं सुंदरनं त्याला झेलबाद केले. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत किवींनी भारतासमोर विजयासाठी 14 धावांचे लक्ष्य ठेवले.भारताकडून विराट कोहली अन् लोकेश राहुल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरले. टीम साउदीच्या पहिल्याच चेंडूवर लोकेशनं षटकार खेचला, दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचून त्यानं धावांचं अन् चेंडूंमधील अंतर कमी केलं. टीम इंडियाला चार चेंडूवर चार धावा हव्या होत्या. पण, तिसऱ्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. कोहलीनं चौथ्या चेंडूवर दोन धावा काढल्या. पाचव्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियानं बाजी मारली.