भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला चौथा ट्वेंटी-20 सामना काही तासांत वेलिंग्टन येथे खेळवण्यात येईल. टीम इंडियानं पहिले तीनही सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे उर्वरीत दोन सामने हे टीम इंडियाला त्यांच्या बेंच स्ट्रेंथची चाचपणी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत टीम इंडियानं फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही विभागात दमदार कामगिरी केलेली आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात काही नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वेलिंग्टनमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण, या सामन्यात पाऊस खोडा घालतो की काय, अशी भीतीही त्यांना सतावत आहे.
आज भारताने प्रयोग करण्याचे ठरवल्यास संजू सॅम्सन व रिषभ पंत यांना संधी मिळू शकते. पंतला अंतिम 11मध्ये स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याची निवड करताना कोणत्या फलंदाजाला वगळण्यात येईल आणि लोकेश राहुल यष्टिरक्षण करणार की नाही, याबाबत उत्सुकता राहील. आघाडीच्या तीन फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, राहुल व कोहली यांचे स्थान पक्के असून श्रेयस अय्यर शानदार फॉर्मात आहे. मनीष पांडे आणि शिवम दुबे यांना अधिक संधी देणे आवश्यक आहे.
गोलंदाजीत बदल होण्याची जास्त अपेक्षा आहे. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव व नवदीप सैनी संधीची प्रतीक्षा करीत आहे. तिघांना एकाचवेळी संधी मिळणार नाही, पण संघव्यवस्थापन एक फिरकीपटू व एक वेगवान गोलंदाज यांना रोटेट करू शकते. शार्दुल ठाकूरच्या स्थानी सैनीला अंतिम ११ खेळाडूत स्थान मिळू शकते. जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबतही निर्णय होऊ शकतो. हॅमिल्टनमध्ये बुमराह महागडा ठरला होता. त्याचा एकदिवसीय व कसोटी संघातही समावेश आहे. त्याच्यावरील वर्कलोड बघता त्याला विश्रांती देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काय सांगतो हवामानाचा अंदाज?शुक्रवारी वेलिंग्टन येथील हवामान क्रिकेट सामन्यासाठी परफेक्ट आहे. निळसर आकाशाखाली आजचा सामना पाहताना चाहत्यांना आणखी आनंद मिळणार आहे. येथील तापमान हे 18 ते 20 डीग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळपट्टीही फलंदाजांसाठी नंदनवन ठरेल आणि धावांचा पाऊस पडल्याचा आस्वाद चाहत्यांना घेता येईल. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणे योग्य ठरेल.
पहिल्या तीन सामन्यांचे संक्षिप्त निकाल
न्यूझीलंडवर विजयासह भारताने रचला इतिहास, केला 'हा' पराक्रमन्यूझीलंड - 5 बाद 203 ( कॉलीन मुन्रो 59, केन विलियम्सन 51, रॉस टेलर 54, मार्टिन गुप्तील 30; रवींद्र जडेजा 1/18) पराभूत वि. भारत - 19 षटकांत 4 बाद 204 ( श्रेयस अय्यर 58, लोकेश राहुल 56, विराट कोहली 45; इश सोढी 2/36), सामनावीर - श्रेयस अय्यर
लोकेश राहुलची दमदार फटकेबाजी, टीम इंडियाची मालिकेत मजबूत आघाडीन्यूझीलंड - 5 बाद 132 ( मार्टिन गुप्तील 33, टीम सेइफर्ट 33*; रवींद्र जडेजा 2/18) पराभूत वि. भारत - 17.3 षटकांत 3 बाद 135 ( लोकेश राहुल 57, श्रेयस अय्यर 44; टीम साउदी 2/20), सामनावीर - लोकेश राहुल
रोहित शर्माचे ते दोन 'हिट', भारतीय संघाचा ऐतिहासिक मालिका विजयभारत - 5 बाद 179 ( रोहित शर्मा 65, विराट कोहली 38; हॅमिश बेन्नेट 3/54) बरोबरी वि. न्यूझीलंड - 6 बाद 179 ( केन विलियम्सन 95, मार्टीन गुप्तील 31; शार्दूल ठाकूर 2/21, मोहम्मद शमी 2/32), सुपर ओव्हर - न्यूझीलंड 17 पराभूत वि. भारत 18, सामनावीर - रोहित शर्मा.