वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कॉफी विथ करन या कार्यक्रमात भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने अश्लील वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारावाई करण्यात आली होती. ही निलंबनाची कारवाई बीसीसीआयने उठवली आणि तो न्यूझीलंडच्या दौऱ्यावर खेळायला गेला. या दौऱ्यातील न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात पंड्याच्या हातून मैदानात एक चुक झाली आणि या चुकीलाही माफी मिळाली नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये आज पाचवा एकदिवसीय सामना सुरु आहे. वेलिंग्टन येथील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान दिले आहे. सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी खेळली. अंबाती रायडू आणि विजय शंकरनं पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या. शेवटी आलेल्या हार्दिकनं 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबाती रायडुनं सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.
डावाच्या अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने एक फटका मारला. हा फटका मारल्यावर पंड्या धाव घेण्यासाठी धावत होता. धावत असताना त्याच्या हातून बॅट निसटली. पण त्यानंतरही पंड्याने दुसरी धावही पूर्ण केली. त्यानंतर गोलंदाज ट्रेंट बोल्टने पंचांच्या निदर्शनास पंड्याची चुक आणून दिली. पंड्याने पहिली धाव घेताना बॅट क्रिझमध्ये नेली नव्हती. त्यामुळे पंड्याने जरी दोन धावा काढल्या असल्या तरी त्याला एकच धाव देण्यात आली आणि ही चुक चांगलीच भोवली.