वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : चौथ्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघ हा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघाने पहिले तीनही सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. पण, चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय संघाची लक्तरे वेशीला टांगली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा वन डे सामना रविवारी वेलिंग्टन येथील बॅसीन रिझर्व्ह येथे खेळवण्यात येणार आहे. बॅसीन रिझर्व्ह आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं भावनिक नातं आहे. शनिवारी येथे दाखल होताच त्यांनी हे नातं जगजाहीर केलं.
भारताचे माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी 1981 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध याच बॅसीन रिझर्व्ह स्टेडियमवर कसोटी संघात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 79 कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले.
''38 वर्षांनंतर येथे आल्याचा मला किती आनंद होत आहे, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. याच ठिकाणाहून माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली होती आणि आजही मी भारतीय संघाचा सदस्य म्हणून येथे आलोय. म्हणातत ना हे जग गोल आहे. येथे आल्यावर अनेक आठवणी ताज्या झाल्या,'' असे शास्त्री म्हणाले.
शास्त्रींनी कसोटी क्रिकेटमध्ये 35.79 च्या सरासरीने 3830 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 128 वन डे सामन्यांत त्यांनी 29.04च्या सरासरी व 4 शतकं व 18 अर्धशतकांच्या सहाय्याने 3108 धावा केल्या आहेत. त्यांनी कसोटीत 151 आणि वन डेत 129 विकेट्सही घेतल्या आहेत.
Web Title: India vs New Zealand 5th ODI : Indian coach Ravi Shastri Gets Nostalgic; Recalls Debut Test at Basin Reserve
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.