वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : महेंद्रसिंग धोनी हा अशक्यप्राय वाटणारी गोष्टही शक्य करू शकतो. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात धोनीने कमाल केली. त्यानंतर चाहत्यांच्या ओठी आपसूकच आले अनहोनी को होनी कर दे महेंद्रसिंग धोनी...
पाचव्या सामन्यात धोनीला फलंदाजीमध्ये फारशी चुणूक दाखवता आली नाही. पण यष्टीरक्षण करताना मात्र त्याने अद्भूत अशीच कामगिरी केली. भारतीय संघ पुन्हा एकदा अचडणीत सापडला असताना कर्णधार रोहित शर्माने केदार जाधवला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केले. केदारने 37व्या षटकात जेम्स निशामच्या विरोधात पायचीतचे अपील केले. यावेळी पंचांनी हे अपील फेटाळले. धोनीनेही सुरुवातीला अपील केले खरे, पण त्यानंतर तो चेंडू घेण्यासाठी धावला. धोनी चेंडूपर्यंत पोहोचत असताना न्यूझीलंडचे फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी धोनीने चतुराई दाखवली आणि चपळतेने चेंडू थेट यष्ट्यांवर फेकला. धोनीने नेमके काय आणि कसे केले हे कुणालाही कळले नाही. अखेर तिसऱ्या पंचांना विचारणे करण्यात आली आणि धोनीने निशामला रन आऊट केल्याचा निर्णय दिल्या.
भारताच्या 253 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दमदार फलंदाजी करत होता. जर केन टिकला तर तो सामना जिंकवू शकतो, हे भारतीय संघाला माहिती होते. त्यामुळेच कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीमध्ये बदल केला आणि केदार जाधवच्या हाती चेंडू सुपूर्द केला. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदारला अशा काही टिप्स दिल्या की, केनला तंबूचा रस्ता धरावा लागला.
भारत विरुद्ध न्यूझीलंडमध्ये आज पाचवा एकदिवसीय सामना सुरु आहे. वेलिंग्टन येथील पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडला 253 धावांचं आव्हान दिले आहे. सामन्यात अंबाती रायडु, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर या खेळाडूंनी शानदार खेळी खेळली. अंबाती रायडू आणि विजय शंकरनं पार्टनरशिपमध्ये 98 धावा तर केदार जाधवच्या पार्टनरशिपमध्ये 74 धावा केल्या. शेवटी आलेल्या हार्दिकनं 5 षटकार लगावत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अंबाती रायडुनं सर्वाधिक 90 धावा केल्या तर हार्दिक पंड्या विजय शंकरने प्रत्येकी 45-45 धावांचे योगदान दिले.