Join us  

India vs New Zealand 5th ODI : 'कॅप्टन कूल' धोनी संघात परतणार, कोणाला डच्चू मिळणार?

India vs New Zealand 5th ODI : कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 12:03 PM

Open in App
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड पाचवा वन डे सामना रविवारीमहेंद्रसिंग धोनी तंदुरूस्त, पाचव्या सामन्यात खेळणारदिनेश कार्तिक किंवा अंबाती रायुडू यांच्यापैकी एकाला डच्चू?

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला चौथ्या वन डे सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 92 धावांवर तंबूत परतला. न्यूझीलंडने हे लक्ष्य सहज पार करून मालिकेतील पहिल्या विजयाची नोंद केली. पाचवा वन डे सामना रविवारी वेलिंग्टन येथे होणार आहे आणि या सामन्यात बाजी मारून पुन्हा विजयपथावर येण्याचा हिटमॅन रोहितचा प्रयत्न आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही पूर्णपणे तंदुरूस्त झाला असून पाचव्या सामन्यात तो खेळणार आहे. धोनीच्या वापसीमुळे संघातून कोणाला डच्चू मिळेल, हे रविवारी टॉसच्या वेळीच कळेल. 

चौथ्या सामन्यात ट्रेंट बोल्ट व कॉलीन डी ग्रँडहोम यांनी भारताच्या दिग्गद फलंदाजांना शरणागती मानण्यास भाग पाडले. या दोघांनी मिळून आठ विकेट घेतल्या, तर युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या व कुलदीप पवार हे भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. या विजयामुळे यजमान संघाचे मनोबल नक्कीच उंचावले असेल आणि पाचवा सामना जिंकून मालिका 2-3 अशी सोडवण्यात त्यांचा निर्धार असेल. पहिले तीन सामने जिंकून भारताने मालिका आधीच खिशात घातली असली तरी शेवटचा सामना जिंकून 4-1 असे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्नात ते असतील. पाचव्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी शनिवारी कसून सराव केला. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला सलामीला प्रयोग करता आले नाही. त्यामुळे शिखर धवन व रोहित शर्मा हेच पाचव्या सामन्यासाठी सलामीवीर असतील. कोहलीच्या जागी संघात स्थान मिळावलेला शुबमन गिल याचे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान निश्चित आहे. भारताचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी धोनी पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याचे खेळणे निश्चित आहे. दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांच्यापैकी एकाला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. 

तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याचे संघातील स्थान कायम आहे, परंतु भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन मोहम्मद शमीला पुन्हा संघात स्थान देण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराजलाही आणखी एक संधी मिळू शकते. कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांनाही विश्रांती दिली जाऊ शकते आणि रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात तो एकही सामना खेळलेला नाही. 

संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, खलील अहमद, मोहम्मद शमी. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध न्यूझीलंडदिनेश कार्तिकरोहित शर्माअंबाती रायुडूकुलदीप यादवयुजवेंद्र चहलभुवनेश्वर कुमारमोहम्मद शामीहार्दिक पांड्याकेदार जाधव