वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. रोहितच्या नेतृत्वावर साऱ्यांनी स्तुतीसुमनांचा वर्षाव केला खरा, पण रोहितच्या शतकी एक्सप्रेसला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माला पाचव्या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. तो 2 धावांवर बाद झाला. चौथ्या सामन्यातही रोहितला सात धावा करता आल्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात रोहितने अनुक्रमे 62 आणि 87 धावा केल्या. पहिल्या सामन्यात रोहितला 11 धावा करता आल्या होत्या.
रोहितने 2107 साली झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर सलग दहा मालिकांमध्ये शतक झळकावले होते. पण न्यूझीलंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत मात्र त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्यामुळे रोहितच्या शतकी एक्सप्रेसला ब्रेक लागल्याचे म्हटले गेले.
आतापर्यंत सलग मालिकांमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम रोहितच्याच नावावर आहे. या यादीमध्ये दुसरा क्रमांक विराट कोहली आणि हशिम अमला यांच्यामध्ये विभागला गेला आहे. या दोघांनी सलग सहा मालिकांमध्ये शतक झळकावले होते. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सलग पाच मालिकांमध्ये शतक झळकावले होते.
रायुडूची दमदार खेळी, अचूक गोलंदाजी आणि महेंद्रसिंग धोनीचे चाणाक्ष यष्टीरक्षकाच्या जोरावर भारताने शेवट गोड केला. पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 4-1 अशा फरकाने खिशात टाकली. रायुडूने दमदार 90 धावांची खेळी साकारल्यामुळे भारताना 252 धावा करता आल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्याचा रायुडू हाच सर्वोत्तम खेळाडू ठरला.