पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळातील तासाभरातच न्यूझीलंडचा दुसरा डाव आटोपला आहे. दुसऱ्या डावात केलेल्या २५५ धावांसह न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियासमोर ३५९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. पुण्याच्या खेळपट्टीवर हे आव्हान खूप मोठे आहे. टीम इंडिया धावांचा पाठलाग करताना नवा इतिहास रचणार का? ते पाहण्याजोगे असेल.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने ५ बाद १९८ धावांवरून डाव पुढे नेण्यास सुरुवात केली. टॉम बंडेल ४१ धावांवर बाद झाला. रवींद्र जाडेजानं टीम इंडियाला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर काही वेळातच जड्डूनं मिचेल सँटनरलाही ४ धावांवर चालते केले. साउदीला अश्विननं खातेही उघडू दिले नाही. एजाज पटेलच्या रुपात जड्डूनं आपल्या खात्यात तिसरी विकेट जमा केली. तो अवघ्या एका धावेची भर घालून माघारी फिरला. विल्यम ओ'रुर्कला रन आउट करत टीम इंडियाने दुसऱ्या डावात न्यूझीलंडला २५५ धावांत रोखले. ग्लेन फिलिप्स ८२ चेंडूत ४८ धावांवर नाबाद राहिला.