आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. भारतीय संघानेही साखळी फेरीत आतापर्यं खेळलेले सर्व आठ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ ही न्यूझीलंडशी पडणार आहे. हा सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास काय होईल, याबाबतच्या शक्यतांचा अंदाज घेतला जात आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पावसाचा व्यत्यय फारसा आलेला नाही. मात्र गेल्या काही काळात मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत उपांत्य फेरीच्या लढतीवेळी पाऊस आला तर त्याबातच्या समीकरणांसाठी आयसीसीने खास व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना होऊ शकला नाही तर अशा परिस्थितीत कोण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल हेही आधीच निश्चित करून ठेवण्यात आले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास खेळ पूर्ण करण्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार जर या सामन्यांत पावसाचा व्यत्यय आला तर सामना हा दुसऱ्या दिवशी पूर्ण केला जाईल. तसेच राखीव दिवशीही पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही, तर याबाबतही आयसीसीने स्पष्ट तरतूद करून ठेवली आहे.
त्यानुसार जर राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही तर पॉईंट्स टेबलमधील दोन्ही संघांची स्थिती पाहिली जाईल. तसेच पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या स्थानावर असलेला संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत जाईल. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत पावसामुळे रद्द करावी लागल्यास दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत प्रवेशाची संधी असेल.
मात्र सध्यातरी १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता फार कमी आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यावेळी मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता केवळ १ टक्का एवढीच आहे. म्हणजेच उपांत्य फेरीचा हा समना कुठल्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ शकतो.