मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता.
पण, उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आल्यामुळे बुधवारी ही लढत खेळवली जाऊ शकते. बुधवारचेही वातावरण खेळण्यास पोषक नसल्याचे कळते. दोन्ही दिवस पावसामुळे वाया गेल्यास सर्वाधिक गुण असलेला संघ म्हणजेत भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जयपराजयाची आकडेवारी 55-45 अशी आहे. वर्ल्ड कपमध्ये मात्र न्यूझीलंड 4-3 असा आघाडीवर आहे.
ओल्ड ट्रॅफर्डचा विक्रम कोणाच्या बाजूनं, भारत की न्यूझीलंड?
भारतीय संघाने मँचेस्टर वर यावर्षी खेळले दोन सामने
भारतीय संघाने यावर्षी मँचेस्टर येथे खेळलेल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवले आहेत. येथे भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला होता, दुसऱ्या लढतीत वेस्ट इंडिजवर 125 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
ओल्ड ट्रॅफर्डवर भारतीय संघाची कामगिरी
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी पाचमध्ये विजय मिळवला आहे. उर्वरित पाच सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता. 1999च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला होता, तेच 1983च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजला नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
ओल्ड ट्रॅफर्डवर न्यूझीलंच संघाची कामगिरी
किवींचा या मैदानावरील विक्रम निराशाजनक आहे. येथे खेळलेल्या सातपैकी दोनच सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला आहे. त्यांना चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर एक सामना रद्द झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही त्यांनी येथे एकच सामना खेळला आणि त्यात त्यांनी वेस्ट इंडिजवर 5 धावांनी विजय मिळवला होता.
मँचेस्टर वर भारत विरुद्ध न्यूझीलंड विक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे एकच सामना खेळला आहे. 1975च्या वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 60 षटकांत 230 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडने 58.5 षटकांत 6 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले होते.
ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमचा विक्रम
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्डवर आतापर्यंत 51 सामने झाले आहेत आणि येथे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यांनी याच वर्षी अफगाणिस्ताविरुद्ध 6 बाद 397 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाचा क्रमांक येतो. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध 5 बाद 336 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका ( 6/325) आहे.
Web Title: India vs New Zealand, ICC World Cup 2019 semifinal: Rain expected to play spoilsport in Manchester clash
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.