हॅमिल्टन : तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आधीच दोन सामने ओळीने जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना शुक्रवारी आठ गड्यांनी गमावला. विक्रमी २०० वा वन-डे खेळणारी कर्णधार मिताली राज हिने क्लीन स्वीपवर भर दिला होता पण प्रारंभी फलंदाजी करणारा भारत १४९ धावांपर्यंतच मर्यादित राहिला. न्यूझीलंडने हे लक्ष्य २९.२ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. मालिकेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृती मानधना हिला गौरविण्यात आले.
तिसºया स्थानावर आलेल्या दीप्ती शर्माने ९० चेंडूत ५२ धावा केल्या. भारताच्या ३५ षटकात ४ बाद ११७ धावा होत्या, तथापि संपूर्ण संघ ४४ षटकांत १४९ धावांत गारद झाला. सामन्यानंतर मिताली म्हणाली, ‘न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकल्याचा मला आनंद आहे. दीप्ती आणि जेमिमासारख्या खेळाडूंनी धावा केल्या. गोलंदाजांनी देखील संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली.
उभय संघांच्या फलंदाजांसाठी ही खेळपट्टी आव्हानात्मक होती. भारताचा पुरुष संघ देखील ओळीने तीन सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात ९२ धावांत गारद झाला होता. न्यूझीलंडकडून अॅना पीटरसनने दहा षटकात २८ धावांत चार गडी बाद केले. वेगवान लिया ताहूहू हिने तीन बळी घेतले. पहिल्या दोन सामन्यात स्मृती मानधना हिने दमदार कामगिरी केली. हरमनप्रीत हिने ४० चेंडूत २४ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून सूजी बेट्सने ५७ आणि अॅमी सेटरवेथ हिने नाबाद ६६ धावा केल्या. तीन सामन्यांची टी-२० मालिका ६ फेब्रुवारीपासून वेलिंग्टन येथे खेळली जाईल.
धावफलक : भारत : जेमीमा रॉड्रिग्ज झे. केर गो. ताहूहू १२, दीप्ती शर्मा झे. पर्किन्स गो. पीटरसन ५२, हरमनप्रीत त्रि.गो. पीटरसन २४, हेमलता झे. बर्नाडाईन गो. केर १३, झुलन नाबाद १२, अवांतर १४, एकूण : ४४ षटकात सर्वबाद १४९. गोलंदाजी : ताहूहू ३-२६, पीटरसन ४-२८, कास्पेरेस १-१८, केर २-४३.
न्यूझीलंड : सूजी बेट्स त्रि. गो. यादव ५७, एमी सेटर्थवेट नाबाद ६६, लॉरेन डाऊन धावबाद १०, सफी डेवाईन नाबाद १७, अवांतर ३, एकूण : २९.२ षटकात २ बाद १५३. गोलंदाजी : यादव १-३१, हेमलता २-०-२२-०.
Web Title: India vs New Zealand: Indian women won the series but lost the match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.