भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेनंतर सर्वांना उत्सुकता लागली आहे ती वन डे मालिकेची. 5 फेब्रुवारीपासून उभय संघांमध्ये तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. पण, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दुखापतीचे ग्रहण आले आहे. टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला दुखापतीमुळे वन डे आणि कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यात आता न्यूझीलंडलाही दुखापतीचा फटका बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं पहिल्या दोन वन डे सामन्यातून माघार घेतली आहे. त्याला ट्वेंटी-20 मालिकेत दुखापत झाली होती.
पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या रोहित शर्माच्या पोटरीला दुखापत झाली. त्या सामन्यात वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावले गेले होते. त्यानं 41 चेंडूंमध्ये 60 धावांची खेळी केल्यानंतर रोहित या लढतीतून रिटायर्ड हर्ट झाला होता. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने संघाचे नेतृत्व केले होते. सोमवारी करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅनमधून त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे आणि कसोटी मालिकेला मुकावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाला दुखापतीनं वेढलं असताना किवींनाही मोठा धक्का बसला आहे. किवींचा कर्णधार केन विलियम्सनला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्यानं मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांतून माघार घेतली आणि आता तो वन डे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळणार नसल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने स्पष्ट केले. त्याचा डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याच्या जागी टॉम लॅथम संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
ट्वेंटी-20 मालिकेत केननं भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतलाट्वेंटी-20 मालिकेत केननं तीन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी करताना भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. पहिल्याच ट्वेंटी-20त केननं 51 धावांची खेळी केली होती, तर तिसऱ्या सामन्यात त्याच्या 95 धावांनी किवींच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण, मोहम्मद शमीच्या अखेरच्या षटकानं सामन्याला कलाटणी दिली.
वन डे भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
IND vs NZ : दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश