India vs New Zealand Live : भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनला ( Ishan Kishan) न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे झालेल्या वन डे सामन्यात सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी फटकारले आहे. या सामन्यात इशान किशनने विकेटच्या मागे हुशारी दाखवत मोठी चूक केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कृत्याबद्दल पंचांनी इशानला ताकीद दिली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
इशान किशनचा चिटींगचा प्रयत्न, सुनील गावस्कर यांचा चढला पारा; टोचले कान, Video
दुसऱ्या वन डे सामन्याच्या न्यूझीलंडच्या डावातील कुलदीप यादवने टाकलेल्या १६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर टॉम लॅथमने फटका मारला आणि चेंडू मागे गेला. किशनने ग्लोव्ह्जमध्ये चेंडू नसतानाही बेल्स पाडल्या अन् अपील केले. किशनने जेव्हा हे अपील केले तेव्हा त्याच्या हातात चेंडू नव्हता, त्याने ग्लोव्ह्जने विकेटला स्पर्श केला होता. पंचांनी किशनला या कृत्याबद्दल ताकीद दिली आहे आणि भविष्यात असे न करण्यास सांगितले आहे. नियमानुसार इशानवर चार वन डे सामन्यांच्या बंदीही कारवाई होणार होती, परंतु पंचांनी फक्त त्याला ताकीद दिली.
ICC आचारसंहिता काय म्हणते?आयसीसी आचारसंहितेच्या इशानने लेव्हल ३ च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. किशनवर त्यानुसार आरोप लावला गेला पाहिजे, कारण त्याने चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. यानुसार त्याला ४ ते १२ वन डे किंवा ट्वेंटी-२० सामन्यांसाठी निलंबित केले गेले असते. ICC आचारसंहितेमध्ये, कलम २.१५ 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अनुचित फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणे' मध्ये "अंपायरला फसवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न" समाविष्ट आहे. उल्लंघनाच्या गांभीर्याचे मूल्यांकन करताना, संबंधित खेळाडूचे वर्तन जाणूनबुजून, बेपर्वा आणि/किंवा निष्काळजीपणाचे होते का याचा विचार केला पाहिजे.
पण, अहवालात असे म्हटले आहे की श्रीनाथने कोणतीही कारवाई केली नाही. कदाचित मैदानावरील पंच अनिल चौधरी किंवा नितीन मेनन यांनी अधिकृतपणे माहिती दिली नाही. त्याचवेळी श्रीनाथने किशन तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"