India vs New Zealand: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील प्रवास सुपर-१२ मध्येच संपुष्टात आला. पण आता टीम इंडियासमोर नवं आव्हान असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध ३ ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये कसोटी मालिका देखील होणार आहे. ट्वेन्टी-२० मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात भारताच्या काही मोठ्या खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. आता कसोटी मालिकेतही भारताच्या चार बड्या खेळाडूंना आराम दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर ट्वेन्टी-२० नंतर कसोटी मालिकेत देखील खेळणार नाहीत. तसंच ट्वेन्टी-२० मालिकेत निवड झालेला ऋभष पंत यालाही कसोटी मालिकेत आराम दिला जाणार आहे. इतकंच नव्हे, तर विराट कोहली देखील कसोटी मालिका खेळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. कोहली कानपूर कसोटीसाठी आराम करेल आणि मुंबईतील कसोटी सामन्यात खेळेल असं सांगण्यात येत आहे. यानंतर भारतीय संघ डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे.
पंतच्या अनुपस्थितीत कोण होणार यष्टीरक्षक?रिषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धीमान साहा याला भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. तसंच केएल भरत याचीही निवड होण्याची दाट शक्यता आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेआधी बीसीसीआयनं खेळाडूंना बायो-बबलमधून दोन दिवसांची सुट्टी देखील दिली आहे. याकाळात खेळाडू आपल्या कुटुंबीयांची भेट घेऊ शकतात.