India vs New Zealand: किवी गोलंदाज ‘रॉक’, टीम इंडिया ‘शॉक’

न्यूझीलंडचा ८ गड्यांनी दणदणीत विजय; भारत स्पर्धेबाहेर जाण्याच्या मार्गावर. न्यूझीलंडचे दोन्ही बळी बुमराहनेच  घेतले आणि तोच यंदाच्या टी-२० विश्वचषकात बळी घेणारा पहिला भारतीय ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 11:24 AM2021-11-01T11:24:23+5:302021-11-01T11:24:47+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand: Kiwi bowler 'Rock', Team India 'Shock' | India vs New Zealand: किवी गोलंदाज ‘रॉक’, टीम इंडिया ‘शॉक’

India vs New Zealand: किवी गोलंदाज ‘रॉक’, टीम इंडिया ‘शॉक’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दुबई : पाकिस्तानविरुद्ध एकही बळी घेण्यात अपयशी ठरल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध किमान एक तरी बळी घेता आला, हीच समाधानाची बाब भारतीय संघाला रविवारी लाभली. एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध ८ गड्यांनी दारुण पराभव झाला. यासह भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा अत्यंत अंधूक झाली आहे.

प्रथम फलंदाजी करावी लागल्यानंतर भारताने २० षटकांत ७ बाद ११० धावांच केल्या. हे माफक लक्ष्य न्यूझीलंडने १४.३ षटकांतच केवळ २ फलंदाजाच्या मोबदल्यात सहजपणे पार केले. जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता भारताच्या इतर कोणाला प्रभावी मारा करता आला नाही. 

न्यूझीलंडचे दोन्ही बळी बुमराहनेच  घेतले आणि तोच यंदाच्या टी-२० विश्वचषकात बळी घेणारा पहिला भारतीय ठरला. रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी व शार्दुल ठाकूर यांनी दहाहून अधिकच्या इकोनॉमी रेटने धावांची खैरात करत न्यूझीलंडच्या विजयाला एकप्रकारे हातभारच लावला. डेरील मिशेल याने ३५ चेंडूंत ४९ धावांची खेळी करत न्यूझीलंडला दणदणीत विजय मिळवून दिला.
त्याआधी, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने ३, तर फिरकीपटू ईश सोढीने २ बळी घेत भारतीयांना रोखले. कागदावर अत्यंत बलाढ्य भासणाऱ्या भारताच्या आघाडीच्या फळीला स्वस्तात बाद करत किवींनी भारतीयांची दाणादाण उडवली.

किवींकडून दहावा पराभव
n २०१३ पासून केवळ तिसऱ्यांदा रोहित शर्माने डावाची सुरुवात केली नाही.
n संघाची प्रथम फलंदाजी असताना रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक ८३ वा षटकार मारताना न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलचा (८२) विक्रम मोडला.
n लोकेश राहुलने ५० वा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला.
n टी-२० मध्ये कर्णधार कोहलीने सलग पाचव्यांदा नाणेफेक गमावली.
n ईश सोढीने टी-२० मध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक १८ बळी घेण्याचा विक्रम केला.
n टी-२० विश्वचषकात भारताची दुसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या.
n टी-२० विश्वचषकात प्रथम फलंदाजी करताना भारताची नीचांकी धावसंख्या.
n आयसीसी स्पर्धेत भारताचा न्यूझीलंडविरुद्ध २००७ सालापासून सलग सहावा पराभव.
n आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध सर्वाधिक विजय मिळविण्यात न्यूझीलंड ९ विजयांसह दुसऱ्या स्थानी. ऑस्ट्रेलिया (११) अव्वल.
n १९९० पासून आयसीसी स्पर्धांमध्ये         न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ११ सामन्यांतील भारताचा दहावा पराभव. केवळ २००३ च्या विश्वचषकात भारताने किवींना नमवले.

सूर्यकुमारच्या जागी इशान किशनला (४) खेळविण्यात आले.  किशनला लोकेश राहुलसोबत (१८) सलामीला खेळण्याची मिळालेली संधी साधता आली नाही. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रोहित शर्माला (१४) पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले, मात्र त्याला याचा फायदा घेता आला नाही. यानंतर त्याने केवळ एक चौकार आणि एक षटकार मारला. किवींनी झटपट तीन प्रमुख फलंदाज बाद करत भारताची आठव्या षटकात ३ बाद ४० अशी अवस्था केली. यावेळी भारतीयांची सर्व मदार कर्णधार कोहलीवर होती. परंतु, अत्यंत सावध पवित्रा घेतल्याने भारताची मंदावलेली धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात कोहली सोढीचा शिकार ठरला. त्याने १७ चेंडूंत केवळ ९ धावांची संथ खेळी खेळली. यानंतर ॠषभ पंत (१२), हार्दिक पांड्या (२३) आणि रवींद्र जडेजा (२६*) यांनाही फारशी फटकेबाजी करता न आल्याने भारताला समाधानकारक मजलही मारता आली नाही.

महत्त्वाच्या सामन्यात         प्रयोग फसला
स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय अनिवार्य होता. त्यातच सूर्यकुमार यादवच्या दुखापतीमुळे युवा इशान किशनला संघात स्थान मिळाले. मात्र, राहुलसोबत अनुभवी रोहित शर्माला सलामीला न पाठविल्याने सर्वांना धक्का बसला. डावखुरा आणि उजवा फलंदाज अशा समीकरणामुळे किशन-राहुल अशी जोडी सलामीला पाठविण्याची भारतीय संघाची चाल सपशेल अपयशी ठरली. अशा निर्णायक सामन्यात तरी रोहित-राहुल यांच्याकडूनच डावाची सुरुवात करायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.

यादवला दुखापत 
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव पाठीच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकला नाही. त्यामुळे  इशान किशन याला संधी देण्यात आली.   बीसीसीआयची वैद्यकीय टीमने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असून तो हॉटेल रुममध्येच थांबला आहे.’

धावफलक 

भारत : लोकेश राहुल झे. मिशेल गो. साऊदी १८, इशान किशन झे. मिशेल गो. बोल्ट ४, रोहित शर्मा झे. गुप्टिल गो. सोढी १४, विराट कोहली झे. बोल्ट गो. सोढी ९, ॠषभ पंत त्रि. गो. मिल्ने १२, हार्दिक पांड्या झे. गुप्टिल गो. बोल्ट २३, रवींद्र जडेजा नाबाद २६, शार्दुल ठाकूर झे. गुप्टिल गो. बोल्ट ०, मोहम्मद शमी नाबाद ०. अवांतर - ४. एकूण : २० षटकांत ७ बाद ११० धावा.
बाद क्रम : १-११, २-३५, ३-४०, ४-४८, ५-७०, ६-९४, ७-९४. गोलंदाजी : टेंट बोल्ट ४-०-२०-३; टिम साऊदी ४-०-२६-१; मिशेल सँटनर ४-०-१५-०; ॲडम मिल्ने ४-०-३०-१; ईश सोढी ४-०-१७-२.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. ठाकूर गो. बुमराह २०, डेरील मिशेल झे. राहुल गो. बुमराह ४९, केन विलियम्सन नाबाद ३३, डीवोन कॉन्वे नाबाद २. अवांतर - ७. एकूण : १४.३ षटकांत २ बाद १११ धावा.
बाद क्रम : १-२४, २-९६. गोलंदाजी : वरुण चक्रवर्ती- ४-०-२३-०; जसप्रीत बुमराह- ४-०-१९-२; रवींद्र जडेजा- २-०-२३-०; मोहम्मद शमी- १-०-११-०; शार्दुल ठाकूर- १.३-०-१७-०; हार्दिक पांड्या २-०-१७-०.

Web Title: India vs New Zealand: Kiwi bowler 'Rock', Team India 'Shock'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.