मँचेस्टर, आयसीसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यात नक्की कोणाला अंतिम अकरामध्ये संधी द्यायची, हा प्रश्न दोन्ही संघांसाठी डोकेदुखीचा ठरणारा आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता येथे कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानावर उतरावे, याचे उत्तर शोधण्यात दोन्ही संघांचे कर्णधार व्यग्र आहेत. या सामन्यात भारतीय संघ भुवनेश्वर कुमार किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणाची निवड करतील? टीम इंडिया दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरेल का? केदार जाधव हा सहावा गोलंदाजाचा पर्याय असेल का ? रवींद्र जडेजाचे संघातील स्थान कायम राहिल का? असे अनेक प्रश्न भारतीय चाहत्यांना भेडसावत आहेत.
शमीनं मिळालेल्या संधीचं सोनं करताना चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, भुवनेश्वर कुमारने तंदुरूस्त होत संघात पुन्हा स्थान पटकावलं. अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शमीला विश्रांती देत भुवीनं पुनरागमन केले होते. हार्दिक पांड्या संपूर्ण 10 षटकं गोलंदाजी करत आहे आणि त्यामुळे शमी किंवा भुवी यापैकी एकालाच संधी मिळेल. जसप्रीत बुमराहचे स्थान पक्कं आहे. भुवीच्या तुलनेत शमीनं जास्त विकेट्स घेतल्या आहेत, सरासरीही उत्तम आहे. त्यामुळे शमी सध्याच्या घडीला आघाडीवर आहे. पण, डेथ ओव्हर्समध्ये भुवीचा मारा प्रभावी ठरला आहे. त्यामुळे दोघांपैकी कोण, हे नाणेफेकीच्या वेळीच समजेल.
कुलदीप आणि चहल यांना एकत्र खेळवणार का? कुलदीपच्या नावावर 5, तर चहलच्या नावावर 10 विकेट्स आहेत, परंतु कुलदीपची सरासरी ही उत्तम आहे. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देईल, असे वाटत नाही. भारतीय संघाने येथे दोन सामने खेळले आहेत आणि कुलदीपनं येथे तीन, तर चहलनं दोन विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान रवींद्र जडेजाच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो. केदार जाधव हा न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी ठरलेला आहे. त्याने केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांना दोनवेळा बाद केले आहे. त्यामुळे सहावा गोलंदाज म्हणून त्याचा विचार केला जाऊ शकतो.
भारताचा संभाव्य संघ : लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव/दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा/कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
न्यूझीलंडच्या संघात एक बदल अपेक्षित आहे. टीम साऊदीच्या जागी ते लॉकी फर्ग्युसनला संधी देऊ शकतात..न्यूझीलंडचा संघः मार्टिन गुप्तील, हेन्री निकोल्स, केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम, जेम्स निशॅम, कॉलीन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.