भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडिया पाच ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 24 जानेवारीपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार असून गेल्या रविवारी टीम इंडियानं आपला 16 सदस्यीय संघ जाहीर केला होता. आज न्यूझीलंडनं ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या तोडीसतोड संघ जाहीर केला. या संघात कर्णधार केन विलियम्सनचे पुनरागमन होणार आहे, शिवाय दोन वर्षांनंतर आणखी एक स्फोटक फलंदाज कमबॅक करत आहे.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाले. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी रोहितने विश्रांती घेतली होती. या संघातून युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. संजूला रिषभ पंतऐवजी खेळवण्यात आले होते. संजूला फक्त दोन सामनेच खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याला संघातून बाहेर काढले आहे. आज न्यूझीलंडनं 14 सदस्यीय संघ जाहीर केला. त्यात त्यांनी हमिश बेन्नेट याला संधी दिली आहे. 2017मध्ये बेन्नेट किवींकडून अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. या मालिकेत कर्णधारपद विलियम्सनच भूषविणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत दुखापतीमुळे विलियम्सन खेळला नव्हता.
न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस ( 4-5 सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम ( पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी.
भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.
ट्वेंटी-20 मालिकेचं वेळापत्रकभारत विरुद्ध न्यूझीलंड - 24 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 26 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 31 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 2 फेब्रुवारी, दुपारी 12.30 वा.