माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझीलंडमध्ये तब्बल 24 वर्षांनी मालिका जिंकली. भारताला हा ऐतिहासिक विजय होता. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. या दमदार विजयासह भारतीय संघाने महिलांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीत वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. भारतीय पुरुष संघाने दहा वर्षांनी न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकली, तर महिलांना हा पराक्रम करण्यासाठी 24 वर्षे वाट पाहावी लागली. भारतीय महिलांनी मंगळवारी झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात 8 विकेट राखून विजय मिळवला. या विजयाबरोबर महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने 35.2 षटकातं 2 बाद 166 धावा करत विजय मिळवला.
पहिल्या सामन्यातील शतकवीर स्मृती मानधनाने पुन्हा एकदा विजयात मोलाचा वाटा उचलला. तिला कर्णधार मिताली राजने उत्तम साथ दिली आणि दोघींनी भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. 1995 मध्ये भारतीय महिलांनी एकमेव वन डे सामना जिंकून मालिका जिंकली होती. त्यानंतर 2005-06 मध्ये न्यूझीलंडने 4-1 अशा फरकाने भारतीय संघाला पराभूत केले. त्यामुळे तब्बल 24 वर्षांनी भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
भारतीय महिलांनी दुसऱ्या वन डे सामन्यात न्यूझीलंडचा डाव 161 धावांवर गुंडाळला. नाणेफेक जिंकून कर्णधार मिताली राजने यजमानांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मातालीचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने 23 धावा देत 3 विकेट घेतल्या. तिला एकता बिस्ट, दिप्ती शर्मा व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत चांगली साथ दिली. न्यूझीलंडच्या अॅमी सॅटरवेटने 71 धावांची खेळी करताना संघाला 161 धावांपर्यंत मजल मारून दिली. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 44.2 षटकांत 161 धावांवर तंबूत परतला.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघालाही साजेशी सुरुवात करता आली नाही. पहिल्या सामन्यात नाबाद 81 धावा करणारी जेमिमा रॉड्रीग्ज ( 1) आणि दिप्ती शर्मा ( 8 ) या माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 15 धावा अशी झाली. मात्र, पहिल्या सामन्यात खणखणीत शतक झळकावणाऱ्या स्मृती मानधना व कर्णधार मिताली यांनी भारताला सुस्थितीत आणले. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघींनी आपापले अर्धशतकही पूर्ण केले. मानधनाने 80 चेंडूंत नाबाद 90 धावा केल्या, तर मितालीने 105 चेंडूंत नाबाद 59 धावा केल्या.