हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. कर्णधार कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारी खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली हॅमिल्टन येथे होणाऱ्या सामन्यात संघात तीन बदल अपेक्षित मानले जात आहेत.
धोनीच्या पुनरागमनाने दिनेश कार्तिक, अंबाती रायुडू किंवा केदार जाधव यांच्यापैकी एकाला बाकावर बसावे लागेल. हे तिघेही चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे माहीसाठी संघात स्थान निर्माण करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला एका खेळाडूला संघाबाहेर करावे लागेल. 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने 4 ते 6 क्रमांकाच्या फलंदाजीसाठी चाचपणी सुरू आहे. कोहलीने रायुडूला पसंती दर्शवली आहे आणि जाधव अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोख पार पाडत आहे. त्यामुळे कार्तिकला वेट अॅण्ड वॉच करावा लागेल.
पहिल्या तीनही सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी गोलंदाज खलील अहमदला संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून शमी सातत्याने खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. भुवनेश्वर कुमार आणि खलील मुख्य गोलंदाजांची भूमिका बजावतील, तर हार्दिक पांड्या त्यांना साहाय्य करेल. रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. त्यामुळे कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहल यांच्यापैकी एक संघाबाहेर होऊ शकतो.
असा असेल संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद, कुलदीप यादव.