हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताने न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण या मालिकेत निर्भेळ यश संपादन करण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. त्यासाठी भारतीय संघाने आता नवीन सरावाची पद्धत अवलंबली आहे. आता भारतीय संघ पडद्यामागून सराव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी दोन एकदिवसीय सामन्यांसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीच्या उपस्थितीत दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले होते. भारताने या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यातील विजयासह भारताने न्यूझालंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली होती.
पडद्यामागून भारतीय संघ कसा सराव करतो, याबाबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर म्हणाले की, " न्यूझीलंडमध्ये हवेचा जोर जास्त असतो. त्यामुळे क्षेत्ररक्षण करायला समस्या जाणवते. यासाठी आम्ही ‘ब्लाइंडफोल्ड’ या तंत्राचा वापर करत आहोत. आम्ही खेळाडूंना पडद्यामागून चेंडू टाकतो. चेंडू कुठे आणि कसा टाकला जाईल, हे त्यांना कळत नाही. पण चेंडू दिसल्यावर त्याचा पाठलाग कसा करायचा याचे प्रशिक्षण आम्ही त्यांना देत आहोत. "
हॅमिल्टनचा इतिहास भारताच्या विरोधातहॅमिल्टन येथे भारतीय संघाने 1981 साली पहिला सामना खेळला होता, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. या स्टेडियमवर विजय मिळवण्यासाठी 2009 साल उजाडले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हॅमिल्टनवर पहिल्यांदा विजयाची चव चाखली. येथे खेळलेल्या पाच सामन्यांत भारताचा तो एकमेव विजय आहे.
शुभमनला मिळणार का पदार्पणाची संधी...न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुभमन गिलला पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कर्णदार विराट कोहलीने शुभमनची तोंडभरून स्तुती केली होती. माझ्यापेक्षाही शुभमनमध्ये चांगली गुणवत्ता या वयामध्ये आहे, असे कोहली म्हणाला होता. कोहलीच्या म्हणण्यानुसार शुभमनला चौथ्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळू शकते.
असा असेल संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद, कुलदीप यादव.