India vs New Zealand Series Rahul Dravid’s Master Act: भारतीय संघ नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. रवी शास्त्री पर्व संपल्यानंतर आता टीम इंडिया राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली पुढील वर्ल्ड कप स्पर्धा खेळणार आहे. रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांचा परस्पर विरोधी स्वभाव असल्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू या नव्या प्रशिक्षकासोबत कसे जुळवून घेतात याची सर्वांना उत्सुकता आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या मनात द्रविडप्रती आदराची भावना आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांच्यावर दडपणही दिसण्याची शक्यता आहे. पण, द्रविडनं खेळाडूंच्या मनाची ही घालमेल ओळखूनच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच एक मोठं पाऊल उचललं आणि त्यामुळे त्याच्याप्रतीचा आदर आणखी वाढला आहे.
भारताचा माजी कर्णधार व महान फलंदाज राहुल द्रविडला Mr. Perfect का म्हणतात हे त्यानं नव्या जबाबदारी स्वीकारल्यानंतही सिद्ध केलं. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिली मालिका खेळणार ते न्यूझीलंडविरुद्ध. त्यासाठी बीसीसीआयनं संघही जाहीर केला आहे. ट्वेंटी-२० मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा या सीनियर्सना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंसह द्रविडला प्लेइंग इलेव्हनची सांगड बसवावी लागणार आहे. त्यात निवड समितीनं संघात पाच सलामीवीर निवडल्यानं कोण, कुठल्या क्रमांकावर खेळेल याचंही गणित द्रविडला बसवायचं आहे. १७ नोव्हेंबरपासून या मलिकेला सुरुवात होणार आहे आणि त्याआधी द्रविडला सपोर्ट स्टाफची नवीन टीमही मिळेल.
मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर द्रविडनं सर्वातआधी भारतीय संघातील सर्व खेळाडूंशी स्वतः कॉल करून संवाद साधला. मागील अनेक दिवसांपासून तो हेच काम करतोय आणि त्यांनी यातून खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबद्दल विचारणा केली. संघ जाहीर झाल्यानंतर द्रविडनं त्याला आणि भारतीय क्रिकेटला काय अपेक्षा आहेत, हेही खेळाडूंना त्यानं समजावलं. बीसीसीआयनं शुक्रवारी भारताचा कसोटी संघ जाहीर केला. त्याआधीही द्रविडनं खेळाडूंशी संवाद साधला आणि निवड समितीला सर्व माहिती दिली. द्रविडच्या या संवादानंतर निवड समितीनं कसोटी संघाची घोषणा केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
- राहुल द्रविडनं प्रत्येक खेळाडूशी स्वतंत्र संवाद साधला
- यावेळी त्यानं खेळाडूंना त्यांच्या मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीची विचारणा केली.
- त्यांना विश्रांती हवी असल्यास ती घ्यावी, असा सल्लाही द्रविडनं खेळाडूंना दिला.
- याचवेळी संघातील तुमच्या स्थानाला कोणताही धोका पोहोचणार नाही, असेही आश्वासन दिले.