पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर पुण्याच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघानं बॅटिंगमध्ये निराश केले. पाहुण्या न्यूझीलंड संघाने यजमान टीम इंडियाचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. पहिल्या डावात २५९ धावा करणाऱ्या न्यूझीलंड संघाला या सामन्यात १०३ धावांची आघाडी मिळाली. २३ वर्षांत पहिल्यांदाच पाहुण्या संघाने भारतीय मैदानात टीम इंडियाविरुद्ध सलग दोन सामन्यात १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहित शर्माच्या नावे कॅप्टन्सीत एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
पराभवाने झाली घरच्या मैदानातील मालिकेची सुरुवात
बंगळुरु कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला पहिल्या डावात ४६ धावांत ऑल आउट केले होते. त्यानंतर ३५६ धावांची आघाडी घेत किवींनी ३६ वर्षांनी टीम इंडिया विरुद्ध कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रमही करून दाखवला. आता पुण्याच्या मैदानात १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेत भारतीय मैदानात पहिली वहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या दिशेने ते वाटचाल करत आहेत.
धोनी-विराटच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानात टीम इंडियावर कधीच ओढावली नाही अशी नामुष्की
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानात खेळताना प्रतिस्पर्धी संघाला कधीच सलग दोन सामन्यात १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेऊ दिली नव्हती. या आधी २३ वर्षांपूर्वी भारतीय मैदानात पाहुण्या संघाने सलग २ सामन्यात १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली होती. ती मालिका भारतीय संघाने २-१ अशी जिंकली होती. पण यावेळी भारतीय संघावर घरच्या मैदानात मालिका गमावण्याची टांगती तलवार लटकताना दिसत आहे.
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली ती वेळ आली, पण...
याआधी २००१ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय मैदानात खेळताना टीम इंडियाविरुद्ध सलग दोन सामन्यात १०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. मुंबई कसोटी सामन्यात कांगारु संघाने १७३ धावांची तर ईडन गार्डन्सच्या कोलकाता कसोटी सामन्यात त्यांनी २७४ धावांची आघाडी घेतली होती. यात ईडन गार्डन कसोटी सामन्यात भारतीय संघाने फॉलोऑननंतर विजय मिळवत इतिहास रचला होता. ही मालिका टीम इंडियाने २-१ अशी जिंकली होती.