वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असल्यामुळे उपकर्णधार रोहित शर्मा आगामी ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत रोहितनेच संघाचे नेतृत्व केले होते. भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-20 मालिका सहा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेत रोहितला 'कॅप्टन' कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
31 वर्षीय रोहितने 12 ट्वेंटी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि त्यात 11 विजय मिळवण्यात भारताला यश आले. दुसरीकडे कोहलीने 20 ट्वेंटी-20 सामन्यांत नेतृत्व करताना भारताला 12 विजय मिळवून दिले आहेत. रोहितला आगामी ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून कर्णधार म्हणून कोहलीचा सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने जिंकण्याचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे. या विक्रमात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 41 विजयांसह ( 72 सामने) आघाडीवर आहे.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ( किमान पाच सामने) भारतीय कर्णधार म्हणून रोहितची विजयाची टक्केवारी अधिक आहे. रोहितची विजयी टक्केवारी 91.66 इतकी आहे, तर कोहलीची टक्केवारी 63.15 अशी आहे. वीरेंद्र सेहवाग (1 सामना) आणि सुरेश रैना ( 3) यांची कर्णधार म्हणून विजयाची टक्केवारी 100 इतकी आहे.