नवी दिल्ली-
न्यूझीलंड विरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका भारतीय संघानं १-० अशा फरकानं जिंकली. या मालिकेत संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. दोघांनी न्यूझीलंड विरुद्ध खेळता आलं नाही. सॅमसन याला भारतीय संघात संधी न दिल्याबद्दल अनेकांकडून सवाल उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावर कर्णधार हार्दिक पंड्यानं आपलं मौन सोडलं आणि पत्रकार परिषदेत रोखठोक उत्तर दिलं.
ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांना येत्या काळात नक्कीच संधी मिळेल आणि बाहेर कोण काय बोलतंय याचा मला फरक पडत नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितलं.
संजू सॅमसन आणि उमरान मलिक यांसारखा युवा खेळाडूंबाबत हार्दिक पंड्यानं आपलं मत व्यक्त केलं. "पहिली गोष्ट म्हणजे कोण काय बोलत आहे याचा या पातळीवर मला काहीच फरक पडत नाही. हा माझा संघ आहे. कोच आणि मला जे योग्य वाटेल तसंच आम्हाला जो संघ हवा आहे तोच आम्ही खेळवतो. अजूनही बराच वेळ आहे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती दिर्घकाळासाठी असेल. मोठी मालिका असती सामने जास्त असते तर नक्कीच संधी मिळाली असती. ही छोटी मालिका होती. मी स्वत: संघात जास्त बदल करण्यावर विश्वास ठेवत नाही आणि पुढेही असं काही करेन असं मला वाटत नाही", असं हार्दिक पंड्या म्हणाला.
"अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी सगळ्या गोष्टी खूप सोप्या ठेवणंच पसंत करतो. मी एका सामन्यात कर्णधारपदी असो किंवा मग संपूर्ण मालिका असो. मी माझ्या पद्धतीनं टीमचे नेतृत्व करेन. ज्या ज्यावेळी मला संधी मिळाली आहे तेव्हा मी त्याच पद्धतीनं क्रिकेट खेळलो आहे की जे मला योग्य वाटत आलं आहे", असंही हार्दिकनं सांगितलं.