दुबई : पाकिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्ध भारताला आज रविवारी टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ साखळी लढतीत ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह खेळावे लागेल. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेचा कस लागणाऱ्या या सामन्यात चाहत्यांची अपेक्षापूर्ती होईल का? याबाबत उत्सुकता आहे. दहा गड्यांनी झालेला पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारावी लागणार आहे. न्यूझीलंडसारख्या उत्कृष्ट संघापुढे हे वाटते तितके सोपे नाही.
टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट हे नेहमी भारतासाठी त्रासदायी ठरतात. कर्णधार केन विलियम्सन शंभर टक्के फिट नाही. मार्टिन गुप्तिलच्या पायाला दुखापत आहे. डेवोन कॉनवे मात्र आक्रमक आणि धोकादायक फलंदाज आहे. पाकविरुद्ध गोलंदाज पूर्णपणे अपयश ठरले होते. न्यूझीलंडविरुद्ध शिथिलता चालणार नाही. पूर्णपणे फिट नसलेला हार्दिक पांड्या आणि फॉर्मशी झुंजणारा भुवनेश्वर कुमार हे संघासाठी कमकुवत सिद्ध होऊ शकतात. कंबरेच्या दुखण्यातून सावरलेला हार्दिक योगदान देण्यात अपयशी ठरत आहे. नेटवर गोलंदाजी करताना देखील तो दडपणात जाणवला. अशावेळी विजय मिळविण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीशिवाय पर्याय नाही.
कर्णधार या नात्याने अखेरची स्पर्धा खेळत असलेला कोहली हार मानणाऱ्यांपैकी नाही. येथे मिळालेल्या अपयशानंतर वन-डे आणि कसोटीतील नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, याची त्याला जाणीव आहेच. तथापि अनेकदा संकटमोचक सिद्ध झालेला कोहली गेल्या काही महिन्यांपासून कर्णधार आणि फलंदाज या दोहोंमध्ये ताळमेळ साधू शकला नाही. भारतीय संघ अखेरच्या टप्प्यापर्यंत खेळत राहणे चाहत्यांचीच नव्हे तर आयसीसीच्या व्यावसायिक हिताची देखील गरज ठरावी. आयपीएल स्टार्सचा भरणा असलेला भारतीय संघ स्पर्धेतून लवकर बाद होण्यास केवळ एक पराभव कारणीभूत ठरू शकतो.
दुसऱ्या स्थानासाठी टक्कर
पाकिस्तानने ओळीने तीनही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. आता त्यांना स्कॉटलॅन्ड आणि नामीबियाविरुद्ध औपचारिकता पूर्ण करायची आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जो बाजी मारेल तो दुसऱ्या स्थानी राहील. दवबिंदू लक्षात घेता नाणेफेक देखील महत्त्वपूर्ण असेल. कोहलीने नाणेफेक जिंकल्यास आघाडीच्या फलंदाजांना ट्रेंट बोल्टच्या स्विंगला सामोरे जावे लागू नये याची काळजी घेईल, कारण बोल्ट हा शाहीन आफ्रिदीपेक्षा जास्त धोकादायक आहे. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत या दोघांकडूनही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा राहणार आहे.
Web Title: india vs new zealand t20 world cup: India's match against New Zealand today is like a semi-final!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.