- सुनील गावसकरभारत आणि न्यूझीलंड संघातला आजचा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो स्थितीतला आहे का? तर याचे उत्तर हो असेच देता येईल. कारण दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी क्रमप्राप्तच. तसेच यापुढच्या सामन्यातही या दोन्ही संघांना कोणत्याही संघाला हलक्यात घेण्याची चूक करता येणार नाही. कारण सध्या अग्रस्थानी असलेल्या पाकिस्तानच्या संघालाही अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. अफगाणिस्तानचा संघ सध्या पूर्ण जोशात आणि प्रत्येक सामन्यागणिक तेवढ्याच आत्मविश्वासाने क्रिकेट खेळताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्याची पूर्ण ताकद ठेवतो.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाला पूर्ण आठवड्याभराचा आराम मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून अपेक्षा आहे की ते उपांत्य फेरी गाठण्याचा दृष्टीने मैदानावर उतरतील आणि पुन्हा एकदा विजयी रथावर स्वार होतील. मुळात भारतीय संघ हा एक मजबूत संघ आहे; पण क्रिकेटमध्ये एखादा दिवस तुमचा नसतो. मात्र, भारतीय खेळाडूंचा तो दिवस नेमका पाकिस्तानविरुद्धच निघाला. माझ्या मते, या पराभवामुळे भारतीय संघात कोणतेही मोठे बदल संघ व्यवस्थापन करणार नाही. खरे सांगायचे झाले तर त्याची काही गरजपण नाही. भारतासमोर हार्दिकची तंदुरुस्ती हाच एक चिंतेचा विषय होता. मात्र, आता त्याने पुन्हा गोलंदाजीचा सराव सुरू केल्याने भारतासाठी ही उत्साह वाढवणारी बातमी ठरली आहे. कारण त्याने जर सामन्यात गोलंदाजी केली, तर तो भारताच्या सहाव्या गोलंदाजाची कसर भरून काढू शकेल.
त्यामुळे तुम्ही गोलंदाजी करा अथवा फलंदाजी, पॉवरप्लेमधील संघाचे प्रदर्शन या सामन्यात निर्णायक ठरू शकते. (टीसीएम)