Join us  

IND vs NZ live T20I : सूर्यकुमार यादवने ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले अन् पुढील १७ चेंडूंत वादळ आणले; पाहा Video

India vs New Zealand T20I series: Live Scorecard -  सूर्यकुमार यादवने ( Suryakumar  Yadav) ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 3:22 PM

Open in App

India vs New Zealand T20I series: Live Scorecard -  सूर्यकुमार यादवने ( Suryakumar  Yadav) ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. भारताच्या १९१ धावांपैकी १११ धावा या सूर्याने चोपल्या. त्याने अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ३२ चेंडू खेळले, परंतु पुढील १७ चेंडूंत वादळी खेळी करताना त्याने शतक पूर्ण केले. कॅलेंडर वर्षातील त्याचे हे ट्वेंटी-२०तील दुसरे शतक ठरले आणि रोहित शर्मा ( १०२८) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने तीन विकेट्स गमावल्या आहेत. 

इशान किशन ( ३६)  व रिषभ पंत ( ६) यांना सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पून्हा संकटमोचक ठरला आणि त्याने शतकी खेळी करताना किवी गोलंदाजांचे बारा वाजवले. कर्णधार हार्दिक पांड्या व श्रेयस अय्यर यांनी सूर्यासोबत समाधानकारक भागीदारी केली. सूर्या व श्रेयस यांनी २१ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली.  श्रेयस अय्यर ( १३) हिट विकेट झाला. लोकेश राहुल, हर्षल पटेल व हार्दिक पांड्या यांच्यानंतर ट्वेंटी-२०त हिटविकेट ठरणारा श्रेयस चौथा भारतीय फलंदाज ठरला. 

सूर्याने ४९ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील दुसरे शतक पूर्ण केले. कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन शतकं झळकावणारा तो रोहित शर्मानंतर दुसरा भारतीय ठरला. हार्दिकने ( १३)  चौथ्या विकेटसाठी सूर्यासोबत ४० चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली. हार्दिक, दीपक हुडा व वॉशिंग्टन सुंदरला त्याने बाद केले. सूर्या ५१ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह १११ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १९१ धावा केल्या. भारताच्या एकूण धावसंख्येतील ६९ धावा या अन्य फलंदाजांच्या व ११ अतिरिक्त धावा आहेत. 

प्रत्युत्तरात मैदानावर आलेल्या यजमानांना भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेंडूवर धक्का देताना फिन अॅलनला भोपळ्यावर बाद केले. डेव्हॉन कॉनवे व कर्णधार केन विलियम्सन या दोघांनी ५६ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कॉनवे २५ धावांवर झेलबाद झाला. ग्लेन फिलिप्स आक्रमक खेळ करण्याच्या पवित्र्यातच मैदानावर उतरला होता. पण, युजवेंद्र चहलने संथ चेंडू टाकून फिलिप्सचा (  १२) त्रिफळा उडवला आणि किवींना ६९ धावांवर तिसरा धक्का दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्मा
Open in App