India vs New Zealand: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता टीम इंडिया द्वीपक्षीय मालिकेवर लक्ष केंद्रीत करत आहे. रोहित शर्मा याला भारतीय ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार घोषीत करण्यात आलं आहे. तर संघाच्या उप-कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे देण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण संभाव्य १६ जणांच्या यादीत तब्बल ५ सलामीवीर फलंदाजांना स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे संघ निवडीवर आत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?सलामीवीर: रोहित शर्मा, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, व्यंकटेश अय्यर (५)मधली फळी: सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर (३)फिरकीपटू: युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल (३)वेगवान गोलंदाज: मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, आवेश खान (५)
न्यूझीलंड विरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या १६ संभाव्य खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. संघ निवडीनुसार विचार करायचा झाल्यास भारतीय संघात एकूण पाच सलामीवीरांना निवडण्यात आलं आहे. तर मधळ्या फळीत फलंदाजी करणारे केवळ ३ खेळाडू निवडण्यात आले आहेत. ट्वेन्टी-२० सामन्यात मोक्याच्या क्षणी सामना खेचून आणण्यासाठी मधल्या फळीतील खेळाडूची कामगिरी अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी भारतीय संघात आता फिनिशरची भूमिका कोण पार पडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोण करणार ओपनिंग?भारतीय संघासाठी आजवर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी सलामीसाठी फलंदाजी केली आहे. पण आता विराट कोहली संघात नाही. तर रोहित शर्मा ओपनिंग करणार की नाही हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. भारतीय संघासाठी झालेली निवड पाहता रोहित शर्मा आता संघात मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो. इशान किशन, व्यंकटेश अय्यर, ऋतूराज गायकवाड आणि केएल राहुल सलामीसाठी पर्याय संघासमोर आहेत.
भविष्याचा विचार करायचा झाल्यास ऋतूराज गायकवाड याला सलामीवीर म्हणून तयार करण्याची चांगली संधी संघासमोर आहे. ऋतूराजनं आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत चांगली फलंदाजी केली आहे. यात रोहित आणि ऋतूराज किंवा केएल राहुल-ऋतूराज अशी जोडी सलामीला दिसून येऊ शकते. तर तिसऱ्या स्थानावर सूर्यकुमार यादव किंवा रोहित शर्मा फलंदाजीला येऊ शकतो. पाचव्या क्रमांकावर फिनिशरच्या स्वरुपात ऋषभ पंतचा विचार केला जाऊ शकतो.