माऊंट मोनगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 62 धावांची खेळी साकारली. रोहितने आपल्या या खेळीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण या सामन्यात दमदार फलंदाजी करताना रोहितने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे.
रोहितने तिसऱ्या सामन्यात भारताला दमदार सुरुवात करून दिली. शिखर धवन बाद झाल्यावर रोहितने कर्णधार विराट कोहलीबरोबर 113 धावांची भागीदारी साकारली. या 62 धावांच्या खेळीत रोहितने 3 चौकार आणि दोन षटकार लगावत धोनीशी बरोबरी केली आहे.
धोनी मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढला होता. सध्या धोनीच्या नावावर 215 षटकार आहे आणि रोहितने त्याच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सध्या सुरु असलेल्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने या मालिकेत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खिशात टाकली.