Join us  

India vs New Zealand 3rd ODI: भारताचा मालिका जिंकण्याचा निर्धार

सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 5:58 AM

Open in App

माऊंट मोनगानुई : भारतीय कर्णधार विराट कोहली ब्रेकपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सोमवारी येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. बीसीसीआयने कोहलीवरील दडपण कमी करण्यासाठी भारतीय कर्णधाराला तिसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका व वन-डे आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका जिंकल्यानंतर कोहली आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यास प्रयत्नशील आहे.सोमवारी विजयासह ३-० अशी आघाडी घेतली तर भारतीय संघ २०१४ मध्ये न्यूझीलंडमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करेल. त्यावेळी भारतीय संघाला ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता. सर्वांची नजर तिसऱ्या वन-डे सामन्यात हार्दिक पांड्यावर केंद्रित झाली आहे. टीव्ही शोमध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर हार्दिकवर अस्थायी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हा अष्टपैलू खेळाडू संघात पुनरागमन करीत आहे.हार्दिकच्या उपस्थितीमुळे संघाचा समतोल साधण्यास मदत मिळते, असे कोहलीने म्हटले आहे. हार्दिकचा पर्याय विजय शंकर उपयुक्त खेळाडू आहे, पण त्याच्यामध्ये बडोद्याच्या अष्टपैलू खेळाडूप्रमाणे ‘एक्स फॅक्टर’ नाही. विजय शंकरला दुसऱ्या वन-डे मध्ये केवळ दोन षटके गोलंदाजी देण्यात आली होती. त्यामुळे हा खेळाडू अद्याप अतिरिक्त जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज नसल्याचे दिसून येते.विजय शंकरच्या तुलनेत हार्दिक वेगाने मारा करू शकतो. विजय शंकरला तिन्ही वन-डे सामन्यात गोलंदाजीमध्ये फलंदाजांना बिट करण्यात अपयश आले. पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम असून मधल्या षटकांमध्ये धावा फटकावण्यासाठी त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. भारतीय संघात या व्यतिरिक्त फार बदल करण्याची गरज दिसत नाही.दुसºया बाजूचा विचार करता न्यूझीलंड संघ कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्या फिरकीपुढे संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. या दोघांनी पहिल्या दोन वन-डे सामन्यांत २० पैकी १२ बळी घेतले आहेत. कुलदीपने पहिल्या दोन सामन्यात ८ बळी घेतले आहेत. त्याने दोन्ही सामन्यात प्रत्येकी चार तर चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यांनी संघासाठी मोक्याच्या वेळी बळी घेतले आहेत. भारतीय फलंदाजांनी दोन्ही सामन्यांत गोलंदाजांना चांगली साथ दिली आहे. शिखर धवनला सूर गवसल्यामुळे भारताची आघाडीची फळी अधिक मजबूत झाली आहे. धवनने पहिल्या वन-डेमध्ये नाबाद ७५ तर दुसºया वन-डेमध्ये ६७ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या होत्या.पहिल्या वन-डेमध्ये अपयशी ठरलेला उपकर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या लढतीत ८७ धावांची खेळी केली आणि आपला सलामीचा सहकारी धवनसह १४ व्यांदा शतकी भागीदारी केली. कर्णधार कोहलीही दोन्ही सामन्यांत फॉर्मात असल्याचे दिसून आले तर अंबाती रायडूने शनिवारी दुसºया वन-डेमध्ये ४९ चेंडूंना सामोरे जाताना ४७ धावा केल्या. अनुभवी महेंद्रसिंग धोनीने कामगिरीत सातत्य राखताना दुसऱ्या वन-डेमध्ये ३३ चेंडूंमध्ये नाबाद ४८ धावा करीत भारताला ३०० चा पल्ला ओलांडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली तर केदार जाधवने फिनिशरची भूमिका पार पाडली. संघाची फलंदाजी मजबूत भासत आहे, पण पाचवा गोलंदाज पाहुण्या संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. त्यामुळे हार्दिकची भूमिका महत्त्वाची ठरते. भारताने विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मधल्या फळीला अद्याप अंतिम रुप दिलेले नाही.तिसऱ्या वन-डेनंतर कोहली ब्रेक घेणार असल्यामुळे दिनेश कार्तिकला कर्णधाराच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत स्थान मिळू शकते. संघ व्यवस्थापन शुभमन गिलला भारतातर्फे पदार्पणाची संधी देऊ शकते. न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन पहिल्या वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणार फलंदाज ठरला होता तर दुसऱ्या वन-डेमध्येही तो फॉर्मात असल्याचे दिसून आले. अष्टपैलू डग ब्रेसवेलने ४६ चेंडूंना सामोरे जाताना ५७ धावांची खेळी करीत पराभवातील अंतर कमी केले .प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या.न्यूजीलंड : केन विलीयम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, मार्टिन गुप्तील, कोलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, हेन्री निकोल्स, डग ब्रेसवेल, लोकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, कोलिन मुन्रो, ईश सोढी, मिशेल सँटनर आणि टीम साऊदी.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीएम. एस. धोनी