India vs New Zealand Series: श्रीलंकेविरुद्धच्या ३ वन डे सामन्यांमध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli) २ शतकं झळकावली. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहली पाचव्या स्थानावर आला आहे आणि तो श्रीलंकेविरुद्ध वन डेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने आता वन डेत ४६ शतकं ठोकली आहेत. विराट कोहलीला आता सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याची संधी आहे. सचिनने वन डेमध्ये ४९ शतकं झळकावली आहेत. कोहलीच्या बॅटमधून ४ शतके झळकताच तो वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज बनेल.
भारताला न्यूझीलंडविरुद्ध फक्त ३ वन डे खेळायचे आहेत आणि जर कोहलीने ३ वन डेत ३ शतकं झळकावली तर तो सचिनची बरोबरी करू शकेल. या मालिकेत कोहली सचिनच्या विक्रमाची बरोबरी करू शकला नाही किंवा विक्रम मोडू शकला नाही, तरी हा फॉर्म कायम राखून तो भविष्यात सचिनला मागे टाकू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान विराटला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत एकही शतक झळकावले, तर तो न्यूझीलंडविरुद्ध वन डेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या रिकी पाँटिंग व वीरेंद्र सेहगाव यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. सेहवाग आणि पाँटिंगने किवी संघाविरुद्ध वन डेत ६ शतकं झळकावली आहेत. यावेळी कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वन डे सामन्यात ५ शतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्ध वन डेमध्ये ५ शतके झळकावण्यातही यश मिळवले आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक वन डे शतकं
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - ५१ सामन्यांत ६ शतकं
- वीरेंद्र सेहवाग (भारत) - २३ सामन्यांत ६ शतकं
- सनथ जयसूर्या (श्रीलंका) - ४७ सामन्यांत ५ शतकं
- विराट कोहली (भारत) - २६ सामन्यांमध्ये ५ शतकं
- सचिन तेंडुलकर (भारत) - ४२ सामन्यांमध्ये ५ शतकं