मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडच्या संघाने उत्तम सांघिक खेळाचा नजराणा पेश करताना भारतीय संघाला हार मानण्यास भाग पाडले. 240 या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची किवी गोलंदाजांसमोर त्रेधातिरपीट उडाली. भारताचे सलामीचे तीन फलंदाज अवघ्या 5 धावांवर माघारी परतले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील ही एखाद्या संघाची सर्वात लाजीरवाणी कामगिरी ठरली. या सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात तू तू मै मै झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा, लोकेश राहुल हे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर संघाचा डाव सावरण्यासाठी अनुभवी खेळाडू मैदानावर येणे अपेक्षित होते. पण, शास्त्रींनी युवा फलंदाज रिषभ पंतला पाठवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर कोहलीही माघारी परतला अन् दिनेश कार्तिक मैदानावर आला. कार्तिकलाही काही विशेष खेळी करता आली नाही. रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मिचेल सँटनरनं ही जोडी फोडली. अनुभव कमी असलेल्या पंतला फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही आणि तो ग्रँडहोमच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पंतने 56 चेंडूत 32 धावा केल्या. पंतचा हा आताताईपणा कॅप्टन कोहलीला आवडला नाही आणि तो बाद होताच त्यानं शास्त्रींसमोर जाऊन तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
पाहा व्हिडीओ...