मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात होईल. पण, लंडनमधील लहरी वातावरणाचा काही नेम नाही. त्यामुळे आज तरी सामना पूर्ण होणार की डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासामोर मोठं आव्हान उभं राहणार? चला तर मग जाणून घेऊया ओल्ड ट्रॅफर्डवरील हवमानाचा अंदाज...
20 षटकांचा सामना झाला तर टार्गेट काय ?आजही पावसाने खोडा घातल्यास डकवर्थ लुईस नियमाचा अवबंल करण्यात आलास भारतासमोर मोठं आव्हान उभ राहू शकते. जर 46 षटकांचा सामना झाला तर भारताला 237 धावांचे टार्गेट मिळेल. जर 30 षटकांचा सामना खेळवला गेला तर भारताला 192 धावा कराव्या लागतील. पण जर 20 षटकांचा सामना झाला तर उपांत्य फेरी जिंकण्यासाठी भारताला 148 धावांचे टार्गेट देण्यात येऊ शकते.
सामना किती वाजता सुरू होईल? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार राखीव दिवशीही सामन्याची वेळ तिच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल.
राखीव दिवशीही सामना न झाल्यास? राखीव दिवशीही सामना न झाल्यास साखळी फेरीत गुणतालिकेत आघाडीवर असलेला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. भारतीय संघाने अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता, तर न्यूझीलंड चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
हवामानाचा अंदाज ?क्रिकेट चाहत्यांसाठी आज आनंदाची वार्ता आहे.... आजच्या हवामानाच्या अंदाजानुसार ओल्ड ट्रॅफर्डवर पाऊस पडण्याची शक्यता 0 ते 10 टक्केच आहे. ढगाळ वातावरण असेल, परंतु अधुनमधून सूर्याची कृपा होईल. त्यामुळे आजचा सामना होईल आणि तोही डकवर्थ लुईस नियमानुसार नाही.