सचिन कोरडे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ‘टॉप ऑर्डर’ पूर्णत: अपयशी ठरल्यामुळे न्यूझीलंडने अर्धा सामना जिंकला होताच. जान आणली ती पंत, पांड्या, धोनी आणि सर रवींद्र जडेजा यांनी. ज्या रोहित-विराटवर जगभर पसरलेल्या भारतीय चाहत्यांच्या नजरा होत्या ते पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर सामन्यात रंगत आणली ती धोनी-जडेजा या जोडीने. सामना पाहणारा प्रत्येक साक्षीदार हा डोळे मिटून देवाचा धावा करीत होता.
प्रत्येक चेंडूकडे नजरा लागल्या होत्या. मनात कॅल्क्युलेशन्स सुरू होती. अशा स्थितीत धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी सामना पुढे नेत सातव्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली.जडेजाने ३९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. समालोचक जडेजाच्या कामगिरीचा उदो उदो करीत होते. कारणही तसेच होते... जर्सी नंबर ८ च्या खेळाडूने विश्वचषकाचा उपांत्य सामना गाजवला. भारत जरी हरला तरी जडेजाने मने जिंकली. कारण त्यानेच लढण्याची धमक दाखवली. सुरुवातीला गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात चमक दाखवणाºया या अष्टपैलू खेळाडूने संघातील आपले स्थान किती महत्त्वाचे आहे हेच सिद्ध केले.
विश्वचषकात त्याला मिळालेली ही दुसरीच संधी होती. म्हणून अर्धशतक पूर्ण होताच जडेजाने आपल्या राजपुती स्टाइलने बॅट तलवारीप्रमाणे हवेत फिरवली. आठव्या क्रमांकावर अर्धशतक झळकावणे हे या विश्वचषकात पहिल्यांदाच घडले. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार ठोकले. तो किवी गोलंदाजांना घाबरला नाही. निडर होत त्याने लढा दिला आणि भारतीयांचा विश्वास जिंकला. जडेजाने या विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध १० षटके फेकत एक बळी घेतला होता. सराव सामन्यातही त्याने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंडच्या खेळपट्टीवर तो नेहमीच यशस्वी ठरलाय. त्याने कारकिर्दीतील सर्वाधिक म्हणजे ८७ धावा इंग्लंडमध्येच कुटल्या आहेत. ५ सप्टेंबर २०१४ नंतरचे हे त्याचे पहिले अर्धशतक ठरले. तेही इंग्लंडमध्येच. म्हणून जड्डू को इग्लंड पसंत है... असे समालोचक म्हणत होते. त्याची ही झुंजार, आशादायक व विश्वासपूर्ण खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही ही खंत मात्र त्याला आणि प्रत्येक भारतीय समर्थकाला सतावत राहील.
धोनीनेच चौथ्या क्रमांकावर यायला हवं होतं, दिग्गजांचा स्ट्रेट ड्राइव्ह...न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारताचे पहिले तिन्ही फलंदाज फक्त पाच धावांवर आऊट झाले होते. त्यावेळी चौथ्या क्रमांकावर धोनीला पाठवला असते, तर सामन्याचा नूर बदलला असता. हे वक्तव्य केलं आहे ते भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
गांगुली यावेळी म्हणाला की, " धोनीला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे होते. कारण तुम्ही २०११चा विश्वचषक पाहिला असेल. २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारताची अशीच अवस्था होती. त्यावेळी धोनी कर्णधार होता. धोनी स्वत: त्यावेळी चौथ्या क्रमांकावर आला होता. चौथ्या क्रमांकावर येऊन धोनीने संघाच्या विजयावर षटकार मारत शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे या सामन्यातही धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे होते."
या पराभवानंतर लक्ष्मण म्हणाला की, " या सामन्यात धोनीला जर चौथ्या क्रमांकावर पाठवले असते तर ते भारतासाठी योग्य ठरले असते. कारण धोनी जर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता तर त्याने डाव सावरला असता आणि त्यानंतर हार्दिक पंड्या, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक हे मोठे फटके खेळू शकले असते. पण त्यासाठी धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवणे महत्वाचे होते."