मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडच्या 239 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीच्या फलंदाजांच्या जीवावर आतापर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाला आज किवींनी धक्का दिला. ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना अवघ्या 5 धावांवर माघारी पाठवले. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली यांना खात्यात प्रत्येकी 1 धावाच जमा करता आली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरीत एखाद्या संघाची नाचक्की झालेली ही दुसरी वेळ ठरली, पण या दोन संघांत आज भारताने बाजी मारली.
कालच्या 5 बाद 211 धावांवरून आज डावाची सुरुवात करणाऱ्या किवींना 28 धावा जोडत्या आल्या. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या. बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजानं त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात मॅट हेन्रीनं हिटमॅन रोहित शर्माला ( 1) यष्टिरक्षक टॉम लॅथमकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीकडून अपेक्षा होत्या, परंतु ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात महत्त्वाचा बळी टिपला. त्यानं कोहलीला पायचीत केले. कोहलीनं DRS घेतला, परंतु अपांयर कॉल राहिल्यानं त्याला माघारी परतावे लागले. त्यापाठोपाठ हेन्रीनं लोकेश राहुलला झेलबाद केले. भारताचे 3 फलंदाज 5 धावांवर माघारी परतले होते. वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील ही सर्वात लाजीरवाणी कामगिरी आहे. यापूर्वी 1996च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध मोहाली येथे ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज 8 धावांत माघारी परतले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 बाद 207 धावा केल्या होत्या आणि तो सामनाही जिंकला होता.