मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. न्यूझीलंड संघाने 18 धावांनी भारतावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. सलामीवीरांच्या अपयशानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी भागीदारी करूनही भारताला विजय मिळवता आला नाही. आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 45 मिनिटांत केलेल्या खराब खेळामुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. त्याचवेळी धोनीच्या निवृत्तीबाबत विचारलेल्या प्रश्नावर कोहलीनं महत्त्वाचं उत्तर दिलं.
पहिल्या दिवसाच्या 5 बाद 211 धावांवरून बुधवारी सुरू झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने 8 बाद 239 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार केन विलियम्सन ( 67) आणि रॉस टेलर ( 74) यांच्या संयमी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान कागदावर तरी सोपं वाटतं असलं तरी किवी गोलंदाजांनी अचूक मारा करताना भारताच्या सलामीवीरांना अवघ्या 3.1 षटकांत माघारी पाठवले. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली यांच्या खात्यात प्रत्येकी एकच धाव जमा झाली. त्यानंतर रिषभ पंत व हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी संयमी खेळ करताना संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. धोनी व जडेजा यांनी 116 धावांची भागीदारी केली. पण, भारताला विजयासाठी 18 धावा कमी पडल्या.
महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्तीची घोषणा करेल का? सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. त्यावर कोहली म्हणाला,''निवृत्तीच्या निर्णयाबद्दल धोनीनं अजून तरी आम्हाला काही सांगितलेले नाही.''
किवींविरुद्ध धोनीनं 72 चेंडूंत 50 धावा केल्या. मार्टिन गुप्तीलच्या अचूक थ्रोमुळे त्याला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. 23 डिसेंबर 2004मध्ये धोनी पहिल्या वन डे सामन्यातही धावबाद झाला होता.