मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारताला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात भारताचे पहिले तिन्ही फलंदाज फक्त पाच धावांवर आऊट झाले होते. त्यावेळी चौथ्या क्रमांकावर धोनीला पाठवला असते, तर सामन्याचा नूर बदलला असता. हे वक्तव्य केलं आहे ते भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
गांगुली यावेळी म्हणाला की, " धोनीला चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला पाठवायला हवे होते. कारण तुम्ही २०११चा विश्वचषक पाहिला असेल. २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारताची अशीच अवस्था होती. त्यावेळी धोनी कर्णधार होता. धोनी स्वत: त्यावेळी चौथ्या क्रमांकावर आला होता. चौथ्या क्रमांकावर येऊन धोनीने संघाच्या विजयावर षटकार मारत शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे या सामन्यातही धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवायला हवे होते."
या पराभवानंतर लक्ष्मण म्हणाला की, " या सामन्यात धोनीला जर चौथ्या क्रमांकावर पाठवले असते तर ते भारतासाठी योग्य ठरले असते. कारण धोनी जर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असता तर त्याने डाव सावरला असता आणि त्यानंतर हार्दिक पंड्या, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि दिनेश कार्तिक हे मोठे फटके खेळू शकले असते. पण त्यासाठी धोनीला चौथ्या क्रमांकावर पाठवणे महत्वाचे होते."
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामन्याच्या अखेरच्या षटकापर्यंत हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येत नव्हते. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंगधोनी यांनी अखेरच्या षटकांमध्ये सामन्यात रंग भरले. पण जडेजा आणि धोनी यांना भारताला विजय मिळवून देता आला नाही. भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.
उत्तम अष्टपैलू खेळाडू कसा असावा, याचा नमुना रवींद्र जडेजानेन्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखवून दिला. कारण जडेजाने चांगील गोलंदाजी केली, उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि लाजवाब फलंदाजी करत त्याने भारताच्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न केला. जडेजा आणि धोनी यांनी शतकी भागीदारी रचली आणि भारताचे आव्हान जीवंत ठेवले.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दयनीय झाली. भारताने आपले पहिले तिन्ही फलंदाज फक्त पाच धावांमध्ये गमावले होते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी एक धावच करता आली. त्यानंतरही दिनेश कार्तिकही स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी काही काळ फलंदाजी करत भारताला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही ऐन वेळी कच खाल्ली. स्थिरस्थावर झाल्यावर मोठे फटके मारण्याच्या नादात या दोघांनी आपली विकेट गमावली. पण त्यानंतर मात्र महेंद्रसिंग धोनीसहरवींद्र जडेजा यांनी डावाची उत्तम बांधणी करत सामना रंगतदार अवस्थेत आणला. जडेजाने ५९ चेंडूंत प्रत्येकी चार षटकार आणि चौकार लगावत ७७ धावा केल्या. धोनीनेही ५० धावांची खेळी साकारली.