मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या सामन्यात खेळपट्टीचा कल हा महत्त्वाच राहणार आहे. त्यामुळे खेळपट्टीचा अंदाज बांधून दोन्ही संघ अंतिम अकरा खेळाडूंची निवड करणार आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार येथे दिवसभर ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि सामन्या दरम्यान पाऊसही पडू शकतो. या मैदानावर खेळलेल्या पाच सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हा सामना वेळेत सुरू झाला, तर मध्यंतरात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार घेतील, असा अंदाज आहे.
पहिल्या डावात खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना मदत करेल, तर दुसऱ्या सत्रात खेळपट्टी संथ होईल. त्यामुळे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला संघर्ष करावा लागणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. ती दोन्ही संघांच्या गोलंदाजांना मदत करणारी आहे. भारतीय गोलंदाज स्विंग गोलंदाजी करण्यात यशस्वी होतील, तर किवींच्या फलंदाजांना धावा करणे अवघड होऊ शकते.
न्यूझीलंडविरुद्ध 'ही' चूक पडू शकते महागात, सांगतोय सचिन तेंडुलकरविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज न्यूझीलंडचा सामना करायला मैदानावर उतरणार आहे. स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहता, भारताचे पारडे जड मानले जात आहे. सट्टेबाजारातही टीम इंडिया आणि रोहित शर्माला पसंती आहे. पण, या सामन्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं कर्णधार कोहली व संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.तेंडुलकर म्हणाला,''आपण ज्या प्रकारे आतापर्यंत खेळत आलो आहोत, तसाच खेळ आजही करायला हवा. इतरांशी तुलना करण्याची गरज नाही. मी टीम इंडियाला सांगू इच्छितो की आपला नैसर्गिक खेळ करा, उगाच प्रयोग करायला जाऊ नका. न्यूझीलंड हा चांगला संघ आहे. त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.''