आकाश नेवे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्युझीलंड यांच्यात विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययाने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला आता बुधवारी म्हणजे राखीव दिवशी उर्वरीत खेळ सुरू होणार आहे. या दरम्यान पावसाने धुऊन काढलेल्या बाद फेरीतील त्या दोन सामन्यांची चर्चा होत आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये साखळी फेरीतील सामन्यांसाठी राखीव दिवस नसतो. राखीव दिवसाचा नियम हा विश्वचषक किंवा अन्य मोठ्या स्पर्धांमध्ये बाद फेरीच्या सामन्यांसाठी असतो. अशा परिस्थितीत राखीव दिवशी देखील सामना न झाल्याच्या दोन घटना आहेत. २००० मधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना आणि १९९९ मधील विश्वचषकाचा सुपर सिक्समधील सामना.
१९९९ च्या विश्वचषकात सुपर सिक्समध्ये न्युझीलंड विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना होता. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्युझीलंडचा डाव ३ बाद ७५ धावांवर असताना पाऊस आणि खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. त्या दिवसाचा खेळ नंतर होऊ शकला नाही. तसेच राखीव दिवशी देखील खेळ झाला नाही. त्यामुळे सुपर सिक्समधून झिम्बाब्वेला उपांत्य फेरी गाठता आली नाही. न्युझीलंडने पाच गुण आणि आपल्या सरस नेटरनरेटच्या आधारावर उपांत्य फेरी गाठली.
दुसरा किस्सा अतिशय रंजक आहे. या सामन्यात दोन्ही दिवशी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली आणि भारत फलंदाजीला आला आणि दोन्ही दिवशी तुफान पाऊस झाला. पुढचा सामनाच झाला नाही. तो होता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २००० चा अंतिम सामना. राखीव दिवशी सुद्धा सामना न झाल्यामुळे भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजयी घोषीत करण्यात आले होते. मात्र सामनावीर आणि मालिकावीर हे पुरस्कार दिले नव्हते.
२९ सप्टेंबर २००० ला भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार होता. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या फलंदाजांनी ५० षटकांत जयसुर्या आणि संगकारा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून वीरेंद्र सेहवाग आणि दिनेश मोंगिया फलंदाजीसाठी उतरले आणि दुसरे षटक संपल्यावर पाऊस सुरू झाला. गुणरत्नेच्या या दुसऱ्या षटकात सेहवागने सलग तीन चौकार मारले होते. मात्र पुढे सामनाच झाला नाही. ३० सप्टेंबरला पुन्हा एकदा दोन्ही संघ मैदानात उतरले. लंकेने ५० षटकांत ७ बाद २२२ धावा केल्या. भारत फलंदाजीला आला आणि ८.४ षटकांच्या खेळानंतर पावसाने वर्चस्व गाजवले. त्यामुळे पुढे सामना झालाच नाही अखेर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. मँचेस्टरला सातत्याने पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आजचा दिवस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता उद्या हा सामना खेळवण्यात येणार असल्याचे समजत आहे.