मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : हिटमॅन रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने पाच शतक झळकावली आहेत आणि एकाच वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यासह त्याने 647 धावांसह ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला ( 638) मागे टाकले आहे. रोहितचा असाच खेळ कायम राहिल्यास भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल, अशी सर्वांना आशा आहे. भारताच्या या सलामीवीराला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी हा वर्ल्ड कप जिंकायचा आहे.
या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती स्वीकारेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे 37 वर्षीय धोनीला अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी भेट देण्याचा संघातील सर्वच सदस्यांचा प्रयत्न असेल. रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितले की,''रोहितचा खेळ अधिक परिपक्व झालेला पाहायला मिळत आहे. 10-12 षटकं त्याने खेळून काढल्यास, तो सहज शतक झळकावून जातो. तो संघाचा उपकर्णधार आहे आणि त्यामुळे खेळपट्टीवर अधिक काळ राहणे किती महत्त्वाचे आहे, याची त्याला जाण आहे.''
2007मध्ये रोहितनं वन डे संघात पदार्पण केले. मात्र, त्याला 2011च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नव्हते. 2015मध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. लाड म्हणाले की,''धोनीनं त्याला सलामीला खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर रोहितनं मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळेच कदाचीत धोनीला भेट म्हणून वर्ल्ड कप देण्याचा त्याचा निर्धार आहे.''
न्यूझीलंडविरुद्ध 'ही' चूक पडू शकते महागात, सांगतोय सचिन तेंडुलकरविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज न्यूझीलंडचा सामना करायला मैदानावर उतरणार आहे. स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहता, भारताचे पारडे जड मानले जात आहे. सट्टेबाजारातही टीम इंडिया आणि रोहित शर्माला पसंती आहे. पण, या सामन्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं कर्णधार कोहली व संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.तेंडुलकर म्हणाला,''आपण ज्या प्रकारे आतापर्यंत खेळत आलो आहोत, तसाच खेळ आजही करायला हवा. इतरांशी तुलना करण्याची गरज नाही. मी टीम इंडियाला सांगू इच्छितो की आपला नैसर्गिक खेळ करा, उगाच प्रयोग करायला जाऊ नका. न्यूझीलंड हा चांगला संघ आहे. त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे.''