IND vs NZ Jasprit Bumrah Becomes The Leading Wicket Taker Record: न्यूझीलंड विरुद्धच्या बंगळुरु कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहनं खास विक्रमाला गवसणी घातली. तिसऱ्या दिवसाच्या खेळात बुमराहनं आपल्या विकेट्सचं खातं उघडलं. टॉम ब्लंडेल (Tom Blundell) च्या रुपात त्याने न्यूझीलंडच्या संघाला पाचवा धक्का दिला. ही विकेट्स खात्यात जमा होताच जसप्रीत बुमराहच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली.
वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला बुमराह, अश्विनसोबत सुरुये स्पर्धा
यंदाच्या वर्षात कसोटीत सर्वाधिक ३९ विकेट्स आता त्याच्या खात्यात जमा झाल्या आहेत. १५ डावात त्याने हा पल्ला गाठला आहे. जसप्रीत बुमराहनं यंदाच्या कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आपलाच सहकारी आर अश्विन याला मागे टाकले. अश्विनच्या खात्यात ३८ विकेट्स जमा आहेत. त्याच्यासह इंग्लंडचा गस ॲटकिन्सन (Gus Atkinson), शोएब बशीर (Shoaib Bashir) आणि श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्या या मंडळींचाही समावेश आहे.
२०२४ मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (Most Test wickets taken in 2024)
- ३९* - जसप्रीत बुमराह (भारत)
- ३८* - आर अश्विन (भारत)
- ३८ - गस ॲटकिन्सन (इंग्लंड)
- ३८ - प्रभात जयसूर्या (श्रीलंका)
- ३८ - शोएब बशीर(इंग्लंड)
यंदाच्या वर्षातील जसप्रीत बुमराहची सर्वोत्तम कामगिरी
बुमराह हा टीम इंडियातील प्रमुख गोलंदाज आहे. या वर्षातील त्याने इंग्लंड विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याचे पाहायला मिळाले होते. फेब्रुवारीमध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने ४५ धावा खर्च करताना ६ विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय वर्षाच्या सुरुवातील जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील केपटाउन कसोटीत त्याने ६१ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्या होत्या.