नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली. भारताने पहिल्या वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडवर 8 विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात तीन विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. या सामन्यात शमीने वन डे क्रिकेटमधील शंभर विकेट्सचा पल्ला ओलांडला आणि सर्वात जलद शंभर विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा मानही त्याने नावावर केला. त्याने हा विक्रम मुलीला समर्पित केला.
शमीने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात मार्टिन गुप्तीलचा त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात त्याने कॉलीन मुन्रोला बाद करून संघाला आणखी एक यश मिळवून दिले. गुप्तीलची विकेट ही शमीसाठी विक्रमी ठरली. त्याने यासह विकेट्सचे शतक साजरे केले. त्याने 56 सामन्यांत ही कामगिरी करताना इरफान पठाणचा ( 59 सामने) विक्रम मोडला. या क्रमवारीत झहीर खान ( 65 ), अजित आगरकर ( 67 ) आणि जावगल श्रीनाथ ( 68 ) हे अव्वल पाचमध्ये येतात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये अफगाणिस्तानच्या रशिद खानच्या नावावर सर्वात जलद शंभर विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 44 सामन्यांत हा पराक्रम केला. शमीने या यादित सहावे स्थान पटकावत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टशी बरोबरी केली. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीला विराट कोहली यांची मिळालेली साथ यामुळे भारताने 156 धावांचे सुधारित लक्ष्य सहज पार केले. भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी कामगिरी केली. त्याने किवींच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. मोहम्मद शमीने तीन, तर युजवेंद्र चहलने दोन विकेट घेतल्या. सामन्यानंतर शमीने ट्विट केले आणि त्याने सर्वांचे आभार मानले. त्याने हा विक्रम मुलीला समर्पित केला.